Vidhan Sabha 2019 : समरजितसिंह घाटगेंच्या डिपॉझीटसाठी वृद्धेने विकल्या शेळ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कागल - चिमगावच्या सोनाबाई आंगज या वृद्धेने दोन शेळ्या विकून कागलचे अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा म्हणून त्यांचे डिपॉझिट भरले. आपण मंडलिक गटाची असून खासदारकीच्या निवडणुकावेळी राजेंनी आमच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्याची परतफेड म्हणून मी ही मदत करीत आहे, अशी भावनाही त्या वृद्धेने व्यक्त केली. 

कागल - चिमगावच्या सोनाबाई आंगज या वृद्धेने दोन शेळ्या विकून कागलचे अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा म्हणून त्यांचे डिपॉझिट भरले. आपण मंडलिक गटाची असून खासदारकीच्या निवडणुकावेळी राजेंनी आमच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. त्याची परतफेड म्हणून मी ही मदत करीत आहे, अशी भावनाही त्या वृद्धेने व्यक्त केली. 

दरम्यान,  कागल, गडहिंग्लजसह उत्तूर मतदारसंघातून समरजितसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घाटगे म्हणाले, कागल, गडहिंग्लजसह उत्तूरच्या स्वाभिमानी जनतेने लाचारी झुगारून देऊन पिवळे वादळ निर्माण केले आहे. आता क्रांती करून स्वराज्य उभा करू या, असे आवाहन समरजितसिंह घाटगे यांनी केले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काढलेल्या विराट पदयात्रेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला. 

गहिनीनाथ गैबीपीर, राममंदीर येथे दर्शनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता झाली. दरम्यान शाहू कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शाहू महाराज, राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास व कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. 

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ""विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांनी स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा वारसा दिला आहे. सदाशिवराव मंडलिक यांनी 2009 च्या निवडणुकीत इतिहास घडवला. लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवून ते विजयी झाले होते. त्या वेळी त्यांची उमेदवारीसुद्धा डावलली होती. त्याचाच स्वाभिमानी जनतेला राग आला आणि जनतेने त्यांची निवडणूक हातात घेऊन त्यांना विजयी केले. नेमका तसाच घटनाक्रम माझ्या उमेदवारीबाबत झाला आहे. स्वाभिमानी जनता या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी पेटून उठली आहे. जनतेच्या आग्रहाखातर स्वाभिमानाची लढाई लढत आहे. मतदारसंघात शाश्वत विकासाच्यानव्या पर्वाला सुरुवात करू या.'' 

श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत प्रविणसिंह घाटगे, श्रीमंत मृगेंद्रसिंह घाटगे, अखिलेश घाटगे, नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, बाबगोंड पाटील, उदयबाबा घोरपडे, बाबासाहेब पाटील, धनाजी पाटील (म्हाकवे), बालाजी फराकटे (बोरवडे), उमेश देसाई व राजाभाऊ माळी (कापशी) तसेच गडहिंग्लज येथून रमेश रिंगणे, राजेंद्र तारळे, राजगोंडा पाटील, दीपक कुराडे, गणपतराव डोंगरे, डॉ.बेनिता डायस, निलांबरी भुईंबर, विठ्ठल भमाणगोळ, भीमराव कोमारे, चंद्रकांत सावंत, विश्वासराव देसाई, आप्पासाहेब पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते. 

दरम्यान श्रीमंत राणोजीराजे घोरपडे (सेनापती कापशी) तब्बेत ठीक नसल्याने येऊ शकले नाहीत, त्यांनी समरजितसिंह घाटगे यांना पाठिंब्याच्या शुभेच्छा दिल्या. 

थोरांचा आशीर्वाद... हीच ऊर्जा.. 
विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांचे अनेक निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते, थोर नेते, मान्यवर, प्रतिष्ठित मला आशीर्वाद देत आहेत. त्यांना जेव्हा-जेव्हा भेटलो, तेव्हा त्यांनी "समरजितराजे, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...! ' असे आशीर्वाद दिले. हीच माझी खरी ऊर्जा आहे असेही घाटगे यांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Samarjeetsingh Ghatge fill from Kagal