Vidhan Sabha 2019 : आमचा एकच नियम खिसा गरम; मगच प्रचारात

Vidhan Sabha 2019 : आमचा एकच नियम खिसा गरम; मगच प्रचारात

कोल्हापूर - ते, पंधरा- वीसजण सकाळी एकाचा आणि संध्याकाळी एकाचा झेंडा हाती घेतात. सकाळी ज्या त्वेषाने घोषणा देतात, त्याच त्वेषाने संध्याकाळी देतात. सकाळी भगवा, संध्याकाळी आणखी कुठला! त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. कोणत्याही रंगाचा झेंडा खांद्यावर घेणे त्यांना वर्ज्य नाही; पण त्यांचा एक नियम आहे, आधी खिसा गरम झाल्याशिवाय कोणाचाही झेंडा घ्यायचा नाही. 

प्रचार फेरीसाठी पैसे घेऊन उतरणाऱ्या लोकांनी या पद्धतीने आपली रोजची कमाई सुरू केली आहे. निवडून कोणीही येऊ दे, आपण आपला फायदा करून घ्यायचा. दिवसभरात सकाळी तीन तास, संध्याकाळी तीन तास मिरवणुकीत फिरून पाच-सहाशे रुपये कमाई करण्याचा हा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. आता गल्लीबोळात प्रचारासाठी पहिल्यासारखे कार्यकर्ते मिळत नसल्याने या लोकांना पैसे देऊन प्रचार फेरीत सामावून घेणे, प्रचार फेरीची गर्दी वाढवणे आवश्‍यकही झाले आहे. 

प्रचारासाठी या मंडळींना कोणताही पक्ष वर्ज्य नाही. ही मंडळी शहराच्या काही विशिष्ट भागात राहतात. उमेदवार थेट त्यांच्या संपर्कात येत नाही; पण काही एजंट उमेदवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. तेच दरमाणशी पगार ठरवतात. त्यातले आपले कमिशन घेतात व प्रचार फेरीसाठी उमेदवारांना ठरवलेल्या वेळी, ठरवलेली माणसे पोहोचवतात. उमेदवाराचे, पक्षाचे समर्थक प्रचार फेरीत असतातच; पण हे पंचवीस-तीस जण आल्याने प्रचारफेरीची ‘लांबी, रुंदी’ वाढते. विशेष हे, की प्रचार फेरीनंतर पैसे असा प्रकार या ठिकाणी नाही. कारण एकदा प्रचार फेरी झाली, की नंतर या मंडळींना कोणी विचारत नाही. त्यामुळे आधी पैसे हातात पडल्याशिवाय कोणीही प्रचार फेरीत येत नाही. 

प्रचारात असे पैसे देऊन लोक सहभागी करायची वेळ येणे, हे लक्षण निश्‍चित चांगले नाही; पण या निमित्ताने काही लोकांना काही दिवसांसाठी रोजगार मिळाला आहे. दिवाळीपूर्वी प्रचार मोहीम सुरू झाल्याने या वर्षी अनेक कुटुंबांत दिवाळीसाठी हातभार लागणार आहे. 

प्रचारफेरीत खरे कार्यकर्ते कोण व बाहेरून आणलेले कोण, हे सहज ओळखता येते, अशी परिस्थिती आहे. कारण सर्वसामान्य परिवारातील ही मंडळी प्रचार फेरीपूर्वी एका बाजूला येऊन थांबलेली असतात. ना त्यांची उमेदवाराशी ओळख असते किंवा त्यांच्याही कोणी ओळखीचे असते. महिला आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन येतात. काहींची लहान मुले हाताला धरून असतात. त्यांना प्रचाराला सुरवात होण्यापूर्वी नाश्‍ता चहा देतात.

घोषणा काय द्यायच्या ते सांगतात. प्रचार फेरीतून मधूनच कोणी पळून जायचे नाही म्हणून दमही देतात. पक्षाचे झेंडे, चिन्हाचे फलक शक्‍यतो यांच्याच हातात दिले जातात. काही जणांना २५०; तर काहींना ३०० रुपये एका प्रचारफेरीसाठी मिळतात; मग सकाळी भगवा, संध्याकाळी निळा, पिवळा, हिरवा कोणताही झेंडा असो. ‘येऊन येऊन येणार कोण?......यांच्याशिवाय हाय कोण?’ अशी कोणाचीही घोषणा देण्यात ते समाधान मानतात. 

खर्चाची नोंद कुठेही नाही!
प्रचारासाठी आणलेल्या या खास मंडळींवर केला जाणारा खर्च कोठेही नोंद होत नाही. तो खर्च इतर कोणत्याही बाबींसाठी नोंद केला जातो. प्रचारासाठी माणसे पुरवणारा एजंट तर खूप चतुर असतो. तो त्यांच्या या ‘धंद्या’बद्दल खूप सावधपणे बोलतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com