Vidhansabha 2019 : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरात नवख्या इच्छुकांची संख्या वाढली

विजयकुमार सोनवणे
रविवार, 7 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी 14 तर शहरातून फक्त दोन इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूरसाठी प्रत्येकी तीनजण इच्छुक आहेत.विशेष म्हणजे यापैकी बहुतांशीनी  पहिल्यांदाच उमेदवारी मागितली आहे.

अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूरसाठी केली उमेदवारीची मागणी
सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी 14 तर शहरातून फक्त दोन इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. अक्कलकोट, बार्शी व दक्षिण सोलापूरसाठी प्रत्येकी तीनजण इच्छुक आहेत.विशेष म्हणजे यापैकी बहुतांशीनी  पहिल्यांदाच उमेदवारी मागितली आहे. 

अर्जांची संख्या पाहता जिल्ह्यातील मतदारसंघातून इच्छुकांची भाऊगर्दी, तर शहरातील मतदारसंघाबाबत मात्र अनास्था दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी 6 जुलैपर्यंत आपले अर्ज शहर व जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन प्रदेश कॉंग्रेस समितीने केले होते. त्याची मुदत शनिवारी संपली. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी सातलिंग शटगार यांनी अर्ज नेला. यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी राजन कामत यांनी अर्ज नेला व प्रदेश कार्यालयात तो दाखलही केला आहे. जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातून प्रशांत कांबळे, जाफरताज पाटील व रावसाहेब व्हनमाने (दक्षिण सोलापूर), शिवाजी काळुंगे (पंढरपूर), जीवनदत्त आरगडे, रमजान पठाण व डॉ. विजय साळुंके (बार्शी), महिबूब मुल्ला, अरुण जाधव व धर्मराज राठोड (अक्कलकोट), गौरव खरात व किशोर पवार (मोहोळ) यांचा समावेश आहे. 

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे (शहर मध्य), भारत भालके (पंढरपूर) व सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट),  दिलीप माने (दक्षिण सोलापूर) यांनी अद्याप आपले अर्ज नेले नाहीत. तथापि ते थेट प्रदेश समितीकडे आपल्या उमेदवारीची मागणी करतील, अशी चर्चा आहे. शहर उत्तर मतदारसंघातून शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह, सुनील रसाळे, सुदीप चाकोते आणि महादेव चाकोते हेही इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र आजअखेर त्यांचे अर्ज आले नाहीत. मध्य मतदारसंघातून माजी महापौर यू. एन. बेरिया आणि नगरसेवक रियाज हुंडेकरी मागणी करू शकतात, असा अंदाज होता. मात्र त्यांनीही अर्ज नेले नाहीत. 

मंगळवारपर्यंत मुदत वाढवली 
इच्छुक उमेदवारीसाठी करण्यात आलेल्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद पाहता, अर्ज नेणे आणि दाखल करण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. तसा निरोप प्रदेश समिती कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे देण्यात आला. त्यामुळे येत्या तीन दिवसांत आणखी काही अर्ज दाखल होतील, असा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Congress Party Interested Candidate Politics