esakal | Vidhansabha 2019 : अमल महाडिकांविरोधात काका की पुतण्या?
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhansabha 2019 : अमल महाडिकांविरोधात काका की पुतण्या?

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या काळात टोकाचा राजकीय संघर्ष असलेल्या आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा एकदा सामना पाहायला मिळणार आहे. त्यातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक यांचे पुत्र व भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात स्वतः पाटील उतरणार की आपले पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरणार, याविषयी उत्सुकता आहे.

Vidhansabha 2019 : अमल महाडिकांविरोधात काका की पुतण्या?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या काळात टोकाचा राजकीय संघर्ष असलेल्या आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा एकदा सामना पाहायला मिळणार आहे. त्यातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक यांचे पुत्र व भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात स्वतः पाटील उतरणार की आपले पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरणार, याविषयी उत्सुकता आहे.
 
गेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून त्याचा बदला घेतला. आता विधानसभा निवडणुकीत विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचा बदला महाडिक घेणार की, पाटील हे गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार, याकडेही राजकीय पटलाचे लक्ष असेल. 

आमदार महाडिक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांबरोबरच कार्यकर्त्यांची वैयक्तिक कामे करण्यात त्यांनी हयगय केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. त्यासाठी मोठा निधीही आणला आहे. तथापि, झालेल्या कामाच्या प्रसिद्धीपेक्षा काम करत राहणे यावर त्यांचा भर आहे. त्यातही वादग्रस्त अशी भूमिकाही पाच वर्षांत त्यांच्याकडून नाही. दुसरीकडे एका पराभवाने खचून न जाता आमदार पाटील यांनीही मतदारसंघातील राबता कायम ठेवला आहे.

गेल्या निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एका छत्रछायेखाली आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून महाडिक आणि त्यांच्या गटालाही हिसका दाखवण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. 
अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेतील पक्षाचे संख्याबळ कायम राहावे, यासाठी विधान परिषद सदस्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचे जाहीर केले. पाटील विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी ते सांगतील त्याला उमेदवारी मिळेल, अशी शक्‍यता आहे. तथापि, निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी द्यायचा निर्णय झाला तर पाटील हे एकमेव सक्षम पर्याय पक्षांसमोर आहेत. त्यातून उमेदवारी मिळाली नाही तर पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरवून ते ‘दक्षिण’ची स्वारी सर करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यात पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजवाली. किंबहुना, त्यांनीच सुरुवातीला महाडिक यांच्या विरोधात ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत मोहीम उघडली. त्याला इतर मतदारसंघांतूनही प्रतिसाद मिळाला. या बदल्यात या मतदारसंघातील शिवसेनेची ताकद छुपी का असेना, त्यांच्याच मागे उभी राहील. शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले तरीही उमेदवार द्यायचा म्हणून शिवसेना एखाद्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालेल; पण अंतर्गत मदत पाटील यांनाच होईल. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू असेल. राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अलीकडेच भाजमध्ये प्रवेश केला. ते राष्ट्रवादीतच राहिले असते, तर या मतदारसंघातील त्यांचे बंधू अमल यांच्या प्रचारात उघडपणे उतरण्यात त्यांना अडचणी होत्या.

आता त्यांचा मार्गच वेगळा झाल्याने ते अमल यांच्या व्यासपीठावरच दिसतील. अमल यांच्या दृष्टीने हा मोठा दिलासा असेल. परंतु, या मतदारसंघात पाटील स्वतः उभारणार की पुतणे ऋतुराजला उभे करणार, यावर लढतीची चुरस अवलंबून आहे. दोघांपैकी कोणीही रिंगणात असले तरी ही लढत काटाजोड असेल एवढे नक्की. 

‘गोकुळ’ मल्टिस्टेटचे पडसाद शक्‍य
सुरुवातीला महापालिकेतील आणि नंतर ‘गोकुळ’मधील राजकारणावरून महाडिक-सतेज संघर्ष पेटला. त्यात गेल्यावर्षी ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वप्रथम पाटील रस्त्यावर उतरले. त्यानंतर जिल्ह्यातील महाडिक विरोधकांना एकत्र करण्यात त्यांना यश आले. त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निवडणुकीत दिसले. आता विधानसभेतही विशेषतः या मतदारसंघात याच मुद्यावरून पाटील यांच्याकडून महाडिक गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न असेल. 

२००९ चे मतदान
 आमदार सतेज पाटील (काँग्रेस) : ८६९४९ 
 धनंजय महाडिक (अपक्ष) : ८११८२
 सूर्यकांत पाटील-बुदिहळकर(भाजप) : १०००८
 दिग्विजय खानविलकर(अपक्ष) : ७८६८
 अरविंद माने(अपक्ष) : १५६४

२०१४ चे मतदान
 आमदार अमल महाडिक(भाजप) : १,०५,४८९
 आमदार सतेज पाटील (काँग्रेस) : ९६,९६१
 विजय देवणे(शिवसेना) : ९,०४८
 राजू दिंडोर्ले - १,५६७
 रवींद्र कांबळे - १,२००

loading image
go to top