आता जनतेच ठरलंय; कोल्हापूर उत्तरमधून 'यांना' आमदार करायच !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - आता जनतेच ठरलंय मधुरिमाराजे छत्रपती यांनाच आमदार करायचं, असा निर्धार आज भवानी मंडपात झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी स्विकारावी, याकरिता छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज जोर धरला.

कोल्हापूर - आता जनतेच ठरलंय मधुरिमाराजे छत्रपती यांनाच आमदार करायचं, या संदर्भात आज भवानी मंडपात निर्धार  बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी स्विकारावी, याकरिता छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोर धरला.

दरम्यान, हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर मधुरिमाराजे यांच्या रुपाने तगडे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सक्रिय असणाऱ्या मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी यापूर्वीही कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी केली होती. मात्र, त्यास त्यांनी नकार दिला होता. यंदाच्या निवडणुकीत तरी त्यांनी कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरबाहेर असताना कार्यकर्त्यांनी आज अचानक भवानी मंडपात बैठक घेतली. मधुरिमाराजे यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी स्विकारावी, असा काही कार्यकर्त्यांचा सूर राहिला.

बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी दसरा चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास अभिवादन केले. त्यानंतर मोटरसायकल फेरीने नवीन राजवाड्याकडे ‌रवाना झाले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती बाहेर गेले असल्याने त्यांनी व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे संपर्क साधला. या वेळी शाहू महाराज यांनी लोकभावनेचा आदर करतो. पण, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बाहेर गेलो असल्याने दोन दिवसांत भेटून बोलू, तर मधुरिमाराजे यांनी छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच 
छत्रपती घराणे जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असून दोन दिवसांत भेटून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. कार्यकर्त्यांनी छत्रपती घराण्याचा विजय असो, अशा घोषणा देत जल्लोष केला. 

या ‌वेळी नगरसेवक राजाराम गायकवाड, प्रकाश नाईकनवरे, अजय इंगवले, आकाश कवाळे, शिवतेज खराडे, पप्पू नलवडे, उमेशचंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाहू महाराज यांची भेट घेऊन येत्या काही दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Kolhapur North Assembly Constituency report