बेळगावात विद्यागम योजना पुन्हा सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

विद्यागम योजनेमुळे राज्यातील ४ लाख ३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता.

बेळगाव : शिक्षण खात्याने विद्यागम योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुढील महिन्यातही शाळा सुरू न झाल्यास विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार शिक्षण खात्याने चालविला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा -  दिव्यांग सुप्रियाची जिद्द ; मटेरिअलच्या ऑनलाईन विक्रीतून झाली आत्मनिर्भर -

अर्धे शैक्षणिक वर्ष संपले, तरी अजूनही शाळा सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ज्यावेळी योजना तात्पुरती बंद करण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांतून विद्यागम योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

विद्यागम योजनेमुळे राज्यातील ४ लाख ३४ विद्यार्थ्यांना लाभ मिळत होता. काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कारण पुढे करत विद्यागम बंद केले. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची शक्‍यता आहे. परिणामी, शाळा लवकर सुरू न झाल्यास विद्यागम विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे मत जाणकारांतून व्यक्‍त होत आहे. राज्यात सरकारी व अनुदानित शाळांत विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मार्चअखेरीस लॉकडाउन जाहीर केल्यापासून सर्व शाळा बंद झाल्या आहेत.

हेही वाचा - फोटोग्राफी क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी बेळगावची नवदुर्गा
 

शैक्षणिक वर्षही वेळेत सुरू झालेले नसून पुढील महिन्यातही शाळा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. काही महिन्यांपासून शहरी भागासह इतर भागांतील काही खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी विद्यागम योजनेशिवाय पर्याय नाही.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidyagama policy start newly in belgaum the government take a decision in belgaum