'त्या' माजी आमदाराचे डाव हाणून पाडू ! विक्रम ढोणेंचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

गेल्या आठवड्यात हरिदास भदे आणि सहकाऱ्यांची मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर भदे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ट्विट स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

सांगली  : अकोला जिल्ह्यातील माजी आमदार हरिदास भदे हे स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वंचित बहुजन आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत. हे पक्षांतर करत असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचे भांडवल करून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रकार त्यांनी चालवला आहे. त्यांच्या पक्षांतरामुळे आरक्षणाचा प्रश्न काडीचाही सुटणार नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने समाजाची फसवणूक आम्ही होवू देणार नाही, हरिदास भदेंचा डाव हाणून पाडू, असा इशारा धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिला आहे.

हे पण वाचा - शाळा, कॉलेज बंद... जोतिबा, अंबाबाईच्या दर्शनाला जाणे भाविकांनी टाळावे.... 

गेल्या आठवड्यात हरिदास भदे आणि सहकाऱ्यांची मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर भदे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे ट्विट स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तसेच धनगर आरक्षणासंबंधी त्यांनी दोन ट्विट केली आहेत. त्या ट्विटमध्ये भाजपवर टीका करताना धनगर आरक्षणासाठी सर्व मिळून प्रयत्न करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. भदे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्यावर पवारांनी जाहीरपणे खुलासा केला आहे. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी भदे यांनी पत्रक काढून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे म्हटले आहे. हे मोघम पत्रक प्रसिद्ध करताना शरद पवार यांच्या ट्विटबद्दल चकार शब्दही त्यांनी काढलेला नाही. शरद पवारांनी स्पष्टपणे प्रवेश झाल्याचे म्हटले आहे, त्याबरोबरच धनगर आरक्षणासंदर्भाने त्यांनी जाहीर मतप्रदर्शन केलेले आहे. मात्र त्यावर भदे बोलत नाहीत. नेमकी माहिती समाजापासून दडवत आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे ढोंग करायचे आणि स्वत:च्या राजकीय मागण्या पूर्ण करायच्या, हा डाव त्यांचा आहे.

हे पण वाचा - तो होता गावातच... हे समजले अन् सिरसंगी गाव हादरले.... 

 हरिदास भदे हे दोनवेळा भारीपचे आमदार होते. विधानसभेत दुसऱ्यांदा पराभूत झाल्याने त्यांनी पक्षांतर केले आहे. धनगर आरक्षण प्रश्नाच्या सोडवणुकीशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे व्होट बॅक पॉलिटिक्स सुरू आहे. धातूर मातूर आश्वासन देवून पुन्हा समाजाची बोळवण करण्याचे षढयंत्र सुरू आहे. ते आम्ही यशस्वी होवू देणार नाही. भदे हे त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यास मोकळे आहेत. मात्र त्यांना त्यासाठी धनगर आरक्षणाचे भांडवल करता येणार नाही. त्यांचा संपूर्ण खोटेपणा आम्ही उघडा पाडू, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikram dhone criticized on haridas bhade