esakal | गाव गाडा रूतला : छोटे-मोठे व्यवसाय बंद ; पोट-पाण्याचे झाले वांदे

बोलून बातमी शोधा

Village carts closed: small and big businesses closed

भिलवडी: परिसरात कोरोनाच्या महामारीने आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतमाल व पुरक व्यवसायाचे सुमारे चार-पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. दीड महिन्यापासून छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने असंख्य लोकांचे पोट-पाण्याचे वांदे झाले. 

गाव गाडा रूतला : छोटे-मोठे व्यवसाय बंद ; पोट-पाण्याचे झाले वांदे
sakal_logo
By
सतीश तोडकर

भिलवडी (जि. सांगली)  : परिसरात कोरोनाच्या महामारीने आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतमाल व पुरक व्यवसायाचे सुमारे चार-पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. दीड महिन्यापासून छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने असंख्य लोकांचे पोट-पाण्याचे वांदे झाले. 

ऑगष्ट महिन्यातील प्रलयकारी महापुराने कृष्णाकाठी मोठी वित्तहानी झाली. मोठ्या प्रमाणात पशूधन गेले. घरे पडली, पिके गेली. त्याने शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे पुरते मोडले. पाच पिढ्यांपासुन काठचा परिसर समृध्द अन्‌ संपन्न बनवणाऱ्या संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे हे रौद्ररूप अविस्मरणीय ठरले. या अस्मानी संकटातुन आता कुठे उभा राहतो ना तोच, कोरोनाच्या महामारीने गाठले. 

लॉकडाऊनमुळे दीड महिन्यांपासून अधिककाळ व्यापार, छोटे मोठे व्यवसाय, त्यावर अवलंबीत रोजगार ठप्प आहे. हॉटेल, फेरीवाले, पानपट्टी, चहा टपरी, हातगाडे असे रोज कमाई होणारे धंदे बंद आहेत. शेतकामासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय मजुर या परिसरात आले. स्थिरावले. त्यांनी व्यापार-उदीम वाढला. साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले, की मजुरांची वर्दळ असते. बाजारपेठेत चलती असते. मात्र लॉकडाऊनमुळे सारेच थंड झाले. दोन कोटींचा व्यापार बुडाला. 

भिलवडी व परिसरातील बारा वाड्यात शेतीबरोबर पुरक पशूपालनाचा व्यवसाय आहे. त्याने असंख्य पुरुष व महिलांच्या हाताला काम दिले. बारमाही हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असल्याने घरटी पशुधन आहे. दुग्ध व्यवसायातील ताज्या पैशाने इथली असंख्य कुटुंबे जगत आहेत. नामंकित चितळे उद्योग समुहाबरोबर चार-पाच डेअरीमध्ये दुधसंकलन होते. चितळे डेअरी, ऍग्रो प्रकल्प परिसरातील अनेक कुटुंबांचा पोशिंदा बनला. "कोरोना'च्या महामारीने त्यात व्यत्यय आला. 

कृष्णाकाठी ऊसाबरोबर केळी, द्राक्ष, पपईसारखी फळपिके, झेंडू, वांगी, टोमॅटो, ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी, कलिंगड अशा पिकांची लागवड होते. लॉकडाऊनने त्यांची विक्री व वाहतुक पुर्ण थांबली. त्यामुळे पुढचा खर्च थांबावा म्हणून काळजावर दगड ठेवत पिकावर नांगर फिरवला. उभ्या पिकात जनावरे घातली. घाम गाळून पिकवलेला शेतीमाल रस्त्याकडेला टाकावा लागला. सुमारे दोन-तीन कोटींचा फटका शेतकऱ्यांस बसला आहे. 
ग्रामीण भागात आजही बारा बलुतेदारी वर्ग पारंपरिक काम करत आहेत. लोहार, चांभार, कुंभार, सुतार, नाभिक, पाथरवट, कोष्टी, साळी माळी यांचे व्यवहारच ठप्प असल्याने त्यांचा उदरनिर्वाह अडचणीत आला आहे. टेम्पो, छोटा टेम्पो, रिक्षा, वडापची चाके थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामे थांबल्याने महिन्याभरापासून त्यांच्या हाताला काम नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. 

भिलवडी येथे मिरज-पुणे लोहमार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. दिवसभरात आठ ते दहा रेल्वेगाडया येऊन धावतात. येथून मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी तासगांव, पलूस तालुक्‍यातील प्रवाशांची मोठी वर्दळ असते. 

लॉकडाऊनने रेल्वे थांबल्याने झालेला तोटा लाखात आहे. महापूर, त्यानंतरच्या कोरोनाने गावगाड्यांचे अर्थकारण थांबलेय. त्याचे दुरगामी परिणाम राहतीलच. हे संकट आणखी किती दिवस चालणार, पुढे कसे होणार हे अनिश्‍चित आहे. "कोरोना'ची टांगती तलवार हटलेली नाही. त्यामुळे आज तरी गावगाडा रूतलेलाच आहे, हे निश्‍चित. 

संकटात शेतकरी टिकला पाहिजे

हॉटेल, छोटे उद्योग बंद झाल्याने घाऊक दुधाची तीस टक्के तर उपपदार्थांची नव्वद टक्के विक्री घटली आहे. पुढेही अनिश्‍चितता आहे. पर्यायाने दुध पावडर निर्मिती सुरु आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झालेला नाही. दुधाला रास्त भाव देणे गरजेचे आहे. संकटात शेतकरी टिकला पाहिजे, असा प्रयत्न आहे. दूध पावडरचे गेल्यावर्षीचे अनुदान मिळालेले नाही. आता तरी ते तत्काळ मिळावे. सरकारने मदतीचा हात पुढे करीत अनुदानाऐवजी थेट पावडर खरेदी करावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देता येईल. व्यवसायही टिकेल.

- निखिल चितळे, भागिदार, चितळे डेअरी, भिलवडी.