कोणाचं काय अन कोणाचं काय, प्याताडांच्या बंदोबस्तासाठी इथे आहे ग्रामरक्षक दल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वडुले बुद्रुक येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री होत असल्याने नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील अनेक गावांतील व्यक्‍ती येथे मद्यपान करण्यासाठी येत असल्याने गावात अशांतता निर्माण झाली आहे

शेवगाव : कोणत्या गावाला काय त्रास असतो, हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या शेवगाव तालुक्‍यात एक आहे, त्या गावाला तळीरामांनी हैराण करून टाकलंय. त्यासाठी गावकऱ्यांनी एक आर्मी उभई केलीय. ही आर्मी मद्यपींपासून गावचे रक्षण करणार आहे. 

जाणून घ्या - प्रशांत गडाख असा करायचे व्हॅलेंटाईन डे

अवैध दारूविक्री व मद्यपींमुळे गावातील शांतता भंग पावत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी वडुले बुद्रुक (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीने ग्रामरक्षक दलाची स्थापना केली आहे. ग्रामसभेत ग्रामसंरक्षक दलातील 11 सदस्यांची निवड झाली. अवैध दारू बंद करण्यासाठी समितीतर्फे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन दिले. 

ही आहे आर्मी 
वडुले बुद्रुक येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री होत असल्याने नागरिकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील अनेक गावांतील व्यक्‍ती येथे मद्यपान करण्यासाठी येत असल्याने गावात अशांतता निर्माण झाली आहे. विद्यार्थी व महिलांना मद्यपींचा नियमित त्रास सहन करावा लागत असल्याने, सरपंच प्रदीप काळे यांनी ग्रामसभेचे आयोजन करून या विषयावर चर्चा केली. त्यामध्ये गावातील अवैध दारूविक्री बंद करून मद्यपींवर कारवाई करण्यासाठी पुढाकार म्हणून ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. त्यामध्ये कृष्णा राख, संदीप गायकवाड, दत्तू केदार, नारायण हरवणे, कृष्णा डमाळ, रोहिदास गाढे, सचिन गायकवाड, अशोक जगताप, शरद पवार, बबन तांबे, उमेश रिसे आदी 11 सदस्यांची निवड झाली. 

पोलिसांकडे कारवाईची मागणी 
सरपंच काळे यांच्यासह गंगाधर चोपडे, भाऊसाहेब चोपडे, भाऊसाहेब पाखरे, कृष्णा निकाळजे, विनायक सागडे, अशोक काळे यांनी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची भेट घेऊन, अवैध दारूविक्री बंद करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village guards established in this village