वादळी पावसाने आटपाडी तालुक्‍यातील गावांचा संपर्क तुटला; ओढ्यांनी पात्र बदलले

नागेश गायकवाड
Thursday, 15 October 2020

वादळी पावसाने आटपाडी तालुक्‍यात आज सकाळपासूनच दिवसभर धुमाकूळ घातला. बहुतांश गावच्या ओढ्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

आटपाडी (जि . सांगली) ः वादळी पावसाने आटपाडी तालुक्‍यात आज सकाळपासूनच दिवसभर धुमाकूळ घातला. बहुतांश गावच्या ओढ्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. चार गावचे बंधारे पाणी न मावल्याने शेतजमिनीतून पाणी शिरल्यामुळे ओढ्याचे पात्रच बदलून गेले. आटपाडीसह 10 - 12 पूल पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायंकाळनंतर पावसाचा प्रचंड जोर वाढला. 

हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आटपाडी तालुक्‍यात हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. पहाटेपासूनच पावसाला सुरवात झाली. आठ वाजता जोर वाढला. तो सायंकाळपर्यंत कायम होता. आटपाडी, दिघंची, राजेवाडी, निंबावडे, आवळाई, खरसुंडी, नेलकरंजी, करगणी, बनपुरी, शेटफळे, माडगुळे, बोंबेवाडी भागात दिवसभर संततधार सुरू राहिली.

बहुतांश गावांचे ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. दुपारपासून बहुतांश सर्वच ओढ्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली. सकाळपासूनच आटपाडीचा मुख्य फरशी पुल, शेटफळे, माळेवाडी, शेटफळे- करगणी, करगणी-तळेवाडी, करगणी-चिंचघाट, अर्जुनवाडी ते गोमेवाडी, शेंडगेवाडी ते बनपुरी, खरसुंडी ते आटपाडीसह पूल पाण्याखाली गेले. अनेक पूल आणि रस्त्यांचे नुकसान झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गोमेवाडी ओढ्यावरील कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी न मावल्यामुळे लगतच्या शेतजमिनीतून पाणी वाहून लागले. 50 - 60 फूट ओढ्याचे पात्र नवीन निर्माण झाले. लगेतच्या शेतजमिनी वाहून गेल्या. असे प्रकार करगणीतील पत्की बंधारा, शेटफळेतील जवळे बंधारा, आटपाडीतील बंधारा बाबतीत घडला. हिवतड येथील माळेवस्ती साठवण तलाव खालील पाझर तलाव फुटल्यामुळे तलावा खालील शेतजमिनीचे नुकसान झाले. अर्जुनवाडी तलावाखालील बंधारा बाहेरून शेत जमिनीतून पाणी गेले. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. लोकांत भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. 

रस्ते, पुल, नालाबांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे यांचे मोठे नुकसान झाले. ओढ्यांलगत असलेल्या शेतजमिनी पिकांसह वाहून जाण्याचे प्रकार घडलेत. ओढ्यालगतच्या विहिरी गाळाने बुजल्या आहेत. माळवदी घरे पडू लागल्याने अनेकांनी घरे सोडलीत. भाजी आणि फळपिकांचे मोठे नुकसान सुरूच आहे. तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सतर्कतेचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायतींनी गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages in Atpadi taluka lost contact due to heavy rain; The streams changed their way