विसापूर, मांजर्डे, कवठेएकंद, येळावी, सावळजला "हाय व्होल्टेज' 

रवींद्र माने
Wednesday, 13 January 2021

तासगाव तालुक्‍यात 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विसापूर, मांजर्डे, कवठेएकंद, येळावी, सावळज येथे "हाय व्होल्टेज' लढती होत आहेत.

तासगाव : तासगाव तालुक्‍यात 39 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विसापूर, मांजर्डे, कवठेएकंद, येळावी, सावळज येथे "हाय व्होल्टेज' लढती होत आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपने लढती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

सावळजनंतर तालुक्‍यात सर्वात लक्षवेधी लढत होत आहे. येळावी येथे येळावी ग्रामपंचायतीसाठी भाजपचे जनजागृती पॅनेल विरुद्ध कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब दादा पाटील आघाडी पॅनेल अशी हाय व्होल्टेज लढत सुरू आहे. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांचे नातू विशाल पाटील, राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांचे नेतृत्व ठरवणारी, भाजपचे पोपट पाटील, हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाचा कस पाहणारी अशी ही लढत सुरू आहे. "विकास' या शब्दाभोवती सद्या प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. 

एकदम हायटेक प्रचार, बड्या नेत्यांच्या प्रचारातील सहभागामुळे येळावी ग्रामपंचायत निवडणूक हायव्होल्टेज ठरली आहे. तासगाव तालुक्‍यातील मात्र खानापूर आटपाडी मतदारसंघात असलेली मांजर्डे ग्रामपंचायत निवडणूक यावेळीही नेहमीप्रमाणे चर्चेत आहे. येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा परंपरागत सामना सुरू आहे. अर्जाच्या छाननीवेळी घेतलेल्या आक्षेपावरूनच निवडणूक संवेदनशील होणार याची चुणूक दिसली होती.

जि. म. बॅंकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांचा हा बालेकिल्ला. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. वीस वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड असलेली ग्रामपंचायत राखण्यासाठी पंचायत समिती सभापती कमल पाटील, मोहन पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

भाजपने सुरुवातीपासून टोकाच्या संघर्षाची भूमिका घेतली आहे. दोन्ही बाजूंचा मतदार ठरलेला आहे. जास्त मतदान मिळविण्यासाठी दोन्ही पक्षाकडून कोणतेही प्रयत्न कमी पडताना दिसत आहेत. अतिशय टोकाच्या प्रचारामुळे मांजर्डे निवडणूक टोकदार, हाय व्होल्टेज बनली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visapur, Manjarde, Kavtheekand, Yelavi, Savlajla "High Voltage" in gram panchayat elections