
विटा (जि. सांगली) पालिका निवडणुकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे.
विटा (जि. सांगली) : पालिका निवडणुकीला अजून वर्षाचा कालावधी असला तरी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. शहराचा समतोल विकास साधत विकासकामे पूर्ण केली जात आहेत. आतापर्यंत 80 टक्के विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे गतीने सुरू असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. एकंदरीत अभियानाच्या निमित्ताने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.
शहरात वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम जोमाने सुरू आहे. स्वच्छ भारत अभियान 2020-21 मध्ये पालिकेने सहभाग घेतला. शहर व उपनगरे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे. दर शुक्रवारी महास्वच्छता अभियान राबवले जाते.
नागरिक, व्यापारी सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावत आहेत. प्रभाग रचना, आरक्षण बदलणार असले तरी या अभियानामुळे सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्षांचा नागरिकांशी थेट संपर्क होत असल्याने आगामी निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांना जमेची बाजू ठरू शकते.
निवडणूक समोर ठेवून जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर आहे. भुयारी गटार योजनेमुळे राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता डांबरीकरण की, क्रॉंक्रिटचा यावरून व विकासकामाच्या निधीवरून मध्यंतरी सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकही पालिका निवडणुकांसाठी सक्रिय होऊ लागले आहेत. भुयारी गटार योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होईल.
शहर, उपनगरात कामांची घाई
वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहर सुशोभीकरण करण्यावर भर आहे. शहर व उपनगरात विकासकामांच्या माध्यमातून सत्ताधारी सुसाट आहेत. निवडणुकीत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
संपादन : युवराज यादव