विटा नगरपालिका वार्तापत्र : विरोधकांना जाग तरी कधी येणार?

दिलीप कोळी
Monday, 15 February 2021

विटा नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली. त्यात त्यांचे दोन नगरसेवक विजयी झाले.

विटा (जि. सांगली) : नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली. त्यात त्यांचे दोन नगरसेवक विजयी झाले. परंतु पाच वर्षांत मात्र विरोधीपक्ष म्हणून ठसा उमटविण्यात त्यांना अपयश आलेय. सध्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून सत्ताधा-यांची स्वच्छता एक्‍सप्रेस सुसाट धावत आहे. मात्र विरोधकांना जाग केंव्हा येणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पालिकेत सत्ताधारी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाचे 23 तर विद्यमान आमदार अनिल बाबर गटाचे दोन नगरसेवक आहेत. दहा वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी आघाडीच्या नावावर आमदार बाबर गट एकटा लढला. लोकांची सहानुभूती या बाजूने होती. मात्र पालिकेत ठसा उमटवण्यात हा गट अपयशी ठरला. एकीकडे सत्ताधारी स्वच्छेतेचे ब्रॅडींग करत असताना अनेक मुद्दे हाताशी असतानाही विरोधक "थांबा आणि पहा' अशा भूमिकेत राहिले. 

साडेचार वर्षात शहर व उपनगरातील समस्यांबाबत विरोधकांनी पत्रकांद्‌वारे इशारे दिले. प्रत्यक्षात किती आंदोलने झाली हा प्रश्न आहे. विरोधकांनी पत्रकातून शहरातील समस्या मांडल्या. मात्र सत्ताधा-यांना विरोध करण्याचे धाडस दाखवले नाही. सत्ताधा-यांवर आरोप करायचे, मात्र ते तडीस नेता न आल्याने सत्ताधा-यांविरूद्ध वातावरण निर्मिती करण्यात विरोधकांना अपयश आलेय. 

पालिका हद्दीतील निकृष्ट रस्त्यांबाबत विरोधी कार्यकर्ते आक्रमक होताना दिसतात. मात्र काही नगरसेवकांची उपस्थिती दिसून येत नाही. सत्ताधा-यांकडून शहरात होत असलेल्या कामांवर विरोधकांनी लक्ष ठेवून समस्या आहेत अशा ठिकाणी आवाज उठवण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. तरच शहराचा विकास दर्जेदार व समतोल पद्धतीने होण्यास मदत होईल. 

सध्या शहरात पालिकेतर्फे होत असलेल्या कामांची सत्ताधा-यांकडून पाहणी करून संबंधितांना दर्जेदार कामे करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. निवडणूकीला एक वर्ष अवधी असला तरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पालिकेने सहभाग घेतल्याने स्वच्छतेच्या माध्यमातून सत्ताधारी शहर व उपनगरातील नागरीकांपर्यंत पोहचत आहेत. विरोधकांनीही गती वाढविणे गरजेचे आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vita Municipal Newsletter: When will the opposition wake up?