विटा पालिका वार्तापत्र : शहर "फाइव्ह स्टार' रॅंकिंगमध्ये आणण्याकडे वाटचाल

दिलीप कोळी
Friday, 29 January 2021

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग तीन वर्षे स्वच्छतेत भारतात अव्वल ठरत असलेल्या  विटा पालिकेने 2020-21 मध्ये विटा शहर "फाइव्ह स्टार' रॅंकिंगमध्ये आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

 विटा (जि. सांगली) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग तीन वर्षे स्वच्छतेत भारतात अव्वल ठरत असलेल्या पालिकेने 2020-21 मध्ये विटा शहर "फाइव्ह स्टार' रॅंकिंगमध्ये आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नागरिकांनीही या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिका विकासकामाबरोबर विटा शहर स्वच्छ ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. तीन वर्षांपासून शहर कचराकुंडीमुक्त आहे. पालिकेची घंटागाडी शहर व उपनगरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करीत आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. काही नागरिकांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरात व उपनगरात चित्रातून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला जात आहे.

ठिकठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. या अभियानासाठी स्वच्छतेचे ब्रॅड अम्बॅसेडर माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत आहेत. नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यास सुरवात केली आहे.

आपापल्या प्रभागातील नगरसेवक स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. त्यास नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत पालिकेतर्फे दान सप्ताह सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ई- वेस्ट, वस्तू, कपडे, पुस्तके, भांडी, ट्री बॅंक, बिया संकलन आदी उपक्रम तयार केले आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. 

स्वच्छतेसाठी एकतेची अपेक्षा 
पालिकेत माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाचे 23, तर विद्यमान आमदार अनिल बाबर गटाचे दोन नगरसेवक आहेत. शहरातील रस्ते, विकासकामांच्या निधीवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असतात. शहरातील स्वच्छतेच्या या अभियानात विरोधकांनीही सहभाग नोंदविल्यास हे अभियान प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vita Palika Newsletter: Moving towards bringing the city in the "Five Star" ranking