वाई मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच, असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई/भिलार/लोणंद - वाई विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या तीन तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. मदन भोसले हे विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच, असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिक भि. दा. भिलारे (गुरुजी) यांचे सुपुत्र अशोकराव भिलारे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किसनराव शिंदे यांच्यासह महाबळेश्‍वरचे नगरसेवक सुनील शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत आखाडे, मेटगुताडचे माजी सरपंच नंदकुमार बावळेकर, रामचंद्र शिंदे, हेमंत शिंदे, तसेच पाचगणीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दिलावर बागवान, नगरसेविका उज्वला महाडिक, तर खंडाळा तालुक्‍यातील प्रदीप क्षीरसागर, अशोक धायगुडे, बबनराव शेळके, हर्षवर्धन शेळके-पाटील आणि केंजळमधील जयप्रकाश जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ताकदीने आणि विश्‍वासाने काम केले आहे, ज्या धडाडीने निर्णय घेतले, त्यामुळे जनतेत हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार, हा विश्‍वास निर्माण झाला आहे. 

ज्यांना जनतेची नाडी कळते, ते सर्वजण भाजपमध्ये येत आहेत. त्याची प्रक्रिया वाई विधानसभा मतदारसंघातही सुरू झाली आहे. वाई, खंडाळा व महाबळेश्‍वरातील अजूनही अनेकजण आपल्या संपर्कात आहेत. त्यांचाही लवकर प्रवेश होईल. मुख्यमंत्री व संपूर्ण सरकार मदन भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे ते विधिमंडळाच्या सभागृहात दिसणारच, हा शब्द मी तुम्हाला देतो. आम्ही कोणाला भीती दाखवून पक्षात आणलेले नाही, तर लोक स्वत:हून येत आहेत.’’ 

मदन भोसले म्हणाले, ‘‘वाई, खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यांसह ज्या-ज्या ठिकाणचे प्रश्‍न मांडले, ते गतीने सोडविण्यास सरकारने सहकार्य केले आहे. एवढ्या ताकदीने आणि तडफेने काम करणारे सरकार असेल तर जनतेला दिलासा आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे. अनेक महत्त्वपूर्ण तसेच वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्‍न सोडविण्याची किमया या सरकारने दाखवली आहे. हेच सरकार आणखी दहा वर्षे सत्तेवर राहिल्यास प्रश्‍नच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळेच भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचा ट्रेलर आज झाला असून लवकरच इतरही अनेकजण भाजपमध्ये दाखल होतील.’’ 

दरम्यान, भाजपच्या वाई तालुका उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ता ढेकाणे यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महाबळेश्‍वरचे नगरसेवक कुमार शिंदे, अनिल जाधव, यशवंत लेले, तानाजीराव भिलारे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, वाईचे नगरसेवक सतीश वैराट, नीलेश महाडिक, उषाताई ओंबळे, यशराज भोसले, संतोष कवी, चेतन पार्टे, शेखर भिलारे, मधुकर बिरामणे, तीनही तालुक्‍यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मजूर फेडरेशनचे संचालक सतीश भोसले यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wai Vidhansabha Constituency NCP Confusion BJP Politics