"कास'च्या फुलांसाठी थोडं थांबा..! 

शैलेन्द्र पाटील
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सातारा - रंगांची उधळण पाहण्या व अनुभवण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांचे पाय लागणाऱ्या कास पठारावर सध्या हलका पाऊस सुरू आहे. पावसाची पुरेशी उघडीप मिळत नसल्याने अलौकिक रानफुलांच्या दर्शनासाठी निसर्गभाविकांना थोडं थांबावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूस व्यवस्थापनाने पूर्वतयारी सुरू केली असून, या वर्षी पठारावर पर्यटकांचे एकही खासगी वाहन जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. 

सातारा - रंगांची उधळण पाहण्या व अनुभवण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांचे पाय लागणाऱ्या कास पठारावर सध्या हलका पाऊस सुरू आहे. पावसाची पुरेशी उघडीप मिळत नसल्याने अलौकिक रानफुलांच्या दर्शनासाठी निसर्गभाविकांना थोडं थांबावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूस व्यवस्थापनाने पूर्वतयारी सुरू केली असून, या वर्षी पठारावर पर्यटकांचे एकही खासगी वाहन जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. कास पठारावरही रिमझिम तर कधी जोराच्या सरी कोसळत आहेत. पठारावर पावसात फुलणाऱ्या फुलांनी हजेरी लावली आहे. मात्र, खास कासची ओळख असणाऱ्या रानफुलांचा बहर पाहण्यासाठी पावसाची उघडीप गरजेची आहे. गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी कासवर पर्यटन शुल्क वसुलीस प्रारंभ झाला होता. पठारावर फुलझाडांच्या उगवणीसाठी ऊन आणि पाऊस अशी दोन्हीची आवश्‍यकता असते. सध्यातरी तशी कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे एक सप्टेंबरपासून पर्यटन शुल्क आकारणे संयुक्तिक होणार नाही, असे मत कास पठार कार्यकारी समितीचे पडले. 

या समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी यंदाच्या हंगामाच्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की ""पठारावर पर्यटकांना खासगी वाहने थांबवता येणार नाहीत. येणाऱ्या पर्यटकांसाठी घाटाई फाट्यापासून सुमारे 100 मीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था असेल. पठारावर येणाऱ्या पर्यटकांची खासगी वाहने तेथेच थांबतील. पार्किंग ते पठार या सुमारे 900 मीटर अंतरासाठी आवश्‍यकतेनुसार दोन ते सहा मिनीबसच्या फेऱ्या सुरू राहतील. त्याकरिता परमाणसी, प्रति फेरी दहा रुपये तिकीट असेल.'' 

""पठारावर गेल्यावर्षीप्रमाणे प्रतिमाणसी 100 रुपये शुल्क असेल. 12 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी, तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (वयाचा खात्रीशीर पुरावा सादर केल्यास) पर्यटन शुल्कातून सूट देण्यात येईल. अभ्यास दौऱ्यातील विद्यार्थ्यांना 20 रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाईल. यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. पार्किंग, तसेच कॅमेरा आदींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार नाही. पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था असणार आहे,'' असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले. 

""पठारावर विशिष्ट हवामानातच रानफुले येतात. ऊन पडल्यामुळे ऊब निर्माण होते. ती या फुलझाडांसाठी पोषक असते. त्याचबरोबर पाऊसही आवश्‍यक आहे. या दोन्ही पैकी एक गोष्ट नसेल तर फुले येत नाहीत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू होण्याची शक्‍यता आहे.'' 
-सोमनाथ जाधव, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

Web Title: Wait for the flowers on kaas pathar