esakal | 'वॉल हँगिंग' उत्पादनांची परदेशी ग्राहकांना भुरळ!
sakal

बोलून बातमी शोधा

wall hanging

हस्तकला उद्योगातील हातमाग विणकर बांधवांनी पारंपरिक वॉल हॅंगिंगच्या पद्धतीत बदल करून देशांतर्गत, विदेशी मार्केट लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी नवीन ट्रेंड आणि परदेशी ग्राहकांना आवडतील अशा डिझाईनमध्ये वॉल हॅंगिंगची उत्पादने घेतली जात आहेत. 

'वॉल हँगिंग' उत्पादनांची परदेशी ग्राहकांना भुरळ!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : हस्तकला उद्योगातील हातमाग विणकर बांधवांनी पारंपरिक वॉल हॅंगिंगच्या पद्धतीत बदल करून देशांतर्गत, विदेशी मार्केट लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी नवीन ट्रेंड आणि परदेशी ग्राहकांना आवडतील अशा डिझाईनमध्ये वॉल हॅंगिंगची उत्पादने घेतली जात आहेत. 

येथील राजेशम सादूल या कलाकाराने काळानुसार विदेशी संस्कृती डोळ्यासमोर ठेवून उत्पादने घेण्यास सुरवात केली आहे. त्यांनी भारतीय पारंपरिक कलेत परिवर्तन केले आहे. मॉडर्न, आकर्षक डिझाईनमुळे नवा लुक मिळालेल्या त्यांच्या वॉल हॅंगिंग उत्पादनांना सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस येथून मागणी होत आहे.

एक्‍स्पोर्ट नियमानुसार आवश्‍यक ते बदल करून 50 ते 60 डिझाईन त्यांनी विदेशातील विक्रेत्यांकडे पाठवले आहेत. आतापर्यंत त्यांच्या 20 डिझाईनची निवड झाली असून, काही डिझाईनसाठी वर्कऑर्डर मिळाले आहे. पुढील काळात मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्‍यता सादूल यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

सोलापुरी वॉल हॅंगिंगची वैशिष्ट्ये 
या उत्पादनात कुठल्याही यंत्र वा विजेवरील मशिनरींचा वापर होत नाही. लाकडी मागावर कॉटन धाग्यांपासून कटवर्क, कर्टन्स, फिगरवर्क, पोट्रेट, निसर्गचित्रे आदी प्रकार हाताने विणले जातात. वॉल हॅंगिंगमध्ये हव्या त्या आकारात हुबेहूब व्यक्तिचित्र बनविण्याची कला येथील कलाकारांनी आत्मसात केली आहे. 

शासनाने राबवाव्यात योजना 
सोलापुरात हातमागावर रेशमी साड्या, बेडशीट, टॉवेल आदींची उत्पादने घेतली जातात. प्रत्येक उत्पादनाची पद्धत वेगळी आहे. पूर्वीच्या मानाने हातमागांची संख्या कमी आहे. त्यातही वॉल हॅंगिंग कला ठराविक विणकरांकडेच आहे. नवीन पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नाही. कारण, उत्पादनांना मागणी कमी आहे. या कलेचा प्रसार व्हावा तसेच या उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी सादूल यांनी केली. 

"वॉल हॅंगिंग व्यवसाय टिकावा व त्यात नवनवीन बदल घडवून ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादने घेण्यासाठी नेहमी प्रयोग सुरू असतात. पारंपरिक डिझाईनमध्ये कल्पकतेने बदल करून ग्राहकांना आकर्षक करणारी उत्पादने घेतल्यास हा उद्योग तग धरू शकतो. यासाठी शासनाने निर्यातीला प्रोत्साहन दिल्यास व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचे आयोजन केल्यास ही कला जगभरात पोचेल."
- राजेशम सादूल, 

loading image
go to top