कृष्णा नदीत आज जलआंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

महापुराच्या नुकसानीपासून मदत आणि पंचनाम्यापासून वंचित राहिलेल्या पाच हजार व्यापाऱ्यांच्या पंचनामा मागणीसाठी उद्या सकाळी अकरा वाजता (ता. 26) प्रजासत्ताक दिनी गणपती मंदिरामागे कृष्णा नदीवर जलआंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीय कृती समितीने दिला आहे.

सांगली : जिल्ह्यात ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या नुकसानीपासून शहरातील अद्याप 25 टक्के नागरिक वंचित आहेत. प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना खोटी माहिती दिली जाते आहे. तातडीने मदत आणि पंचनाम्यापासून वंचित राहिलेल्या पाच हजार व्यापाऱ्यांच्या पंचनामा मागणीसाठी उद्या सकाळी अकरा वाजता (ता. 26) प्रजासत्ताक दिनी गणपती मंदिरामागे कृष्णा नदीवर जलआंदोलन करण्याचा इशारा सर्व पक्षीय कृती समितीने दिला आहे.

याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनाही मागण्यांचे निवेदन दिले आहे. प्रशासनाला तर 20 दिवसांपूर्वी नोटीस दिल्याची माहिती सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी आज दिली. 

ऑगस्टमधील महापुराने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. त्यात शहरातील नुकसान मोठे होते. सरकारकडून 75 टक्के लोकांना मदत मिळाली. मात्र, अद्यापही 25 टक्के लोकांना सानुग्रह अनुदान, पशुंची हानी, शेतीचे नुकसानीसह व्यापाऱ्यांना मदत मिळालेली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पाच हजार व्यापाऱ्यांचे अर्ज प्रशासनाकडे देऊनही वेळकाढू भूमिका घेतली जात आहे. 

प्रशासनाला 20 दिवसांपूर्वी अंतिम नोटीस दिली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनाही आज याबाबत लेखी निवेदन दिले आहे. यावेळी कृती समितीचे अमर पडळकर, आश्रफ वाणकर, महेश खराडे, आसिफ बाबा, विशाल हिप्परकर, आशिष कोरी, प्रदीप कांबळे, सोमनाथ सूर्यवंशी, कामराण सय्यद, मयूर घोडके यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी चर्चा केली. मंत्री श्री. पाटील यांनी प्रशासन आणि जिल्हा नियोजनच्या बैठकीत तातडीने निर्णय घेऊ असे सांगितले आहे. तरीही प्रशासनाच्या नाकर्तेपणा, निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय कृती समितीतर्फे आंदोलनात नागरिक, व्यापारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water movement in Krishna river today