
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा सांगली जिल्ह्याचा 513 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
सांगली ः केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा जिल्ह्याचा 513 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात 538 गावे आणि 3 हजार 250 वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. गावठाण आणि मळाभागातील समूह वस्त्यांवर प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याची ही योजना असून ती 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्यात अनेक गावांमध्ये सध्या योजनाच कार्यान्वित नाही आणि जतसारख्या तालुक्यात नेमकी कोणत्या स्वरुपाची योजना राबवायची यावर एकमत नाही, अशा अडचणी असणार आहेत. जिल्हा परिषदेने त्यावर काम सुरू केले आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवले गेले पाहिजे, या हेतूने ही योजना आखण्यात आली आहे. त्यात प्रत्येक घर, प्रत्येक शाळा, अंगणवाडी, दवाखाना, वाडी-वस्ती येथे नळ कनेक्शन दिले जाईल. त्यासाठी गाव निहाय स्वतंत्र आराखडा मागवण्यात आला आहे. शाळांकडून आराखडा घेतला जाणार आहे. जतसारखा दुष्काळी भाग, शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात हे काम अधिक आव्हानात्मक असणार आहे.
ऊस पट्टयातील लोकसंख्या बहुतांशी गावठाणात वसलेली आहे. अन्यत्र, विखुरलेल्या लोकसंख्येपर्यंत ही योजना प्रभावीपणे राबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी समूह वस्त्यांची निवड केली जाणार आहे.
जिल्ह्यातील बहुतांश प्रादेशिक नळपाणी योजना अडचणीत आहेत. अनेक बंद पडल्या आहेत. भविष्यात अशा योजना राबवण्याबाबत लोकांचा विरोध आहे. या घडीला स्वतंत्र पाणी योजनांवरच भर दिला जात आहे. कालव्याचे पाणी तलावात सोडून त्यावर योजना राबवण्याबाबत यंत्रणा आग्रही आहेत.
त्यामुळे दुष्काळी टापूत टेंभू, ताकारा, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे योजनेचे महत्त्व अधिक असणार आहे. त्यावर अवलंबून लोकसंख्या मोठी आहे. त्या ठिकाणी ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. त्यासाठी एकपेक्षा अधिक पाण्याच्या टाक्या असणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील चार वर्षांत योजनेला आराखड्याप्रमाणे निधी मिळणार का, याकडे लक्ष असेल.
योजना प्रभावीपणे राबवली जाईल
जिल्ह्याचा निम्मा भाग दुष्काळी आहे. त्याचा पाण्यासाठीचा संघर्ष थांबला पाहिजे. त्याबाबत जिल्हा परिषद आग्रही आहे. प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याची जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाईल. त्यात कुठेही कसूर होणार नाही. गावठाण आणि वाड्या वस्त्यांवरील प्रत्येक घरात पाणी पोहोचेल, यासाठी यंत्रणा काम करेल.
- प्राजक्ता कोरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
संपादन : युवराज यादव