कडेगाव तालुक्‍यात पावसाळ्यात पाणी टंचाई 

रवींद्र मोहिते 
Sunday, 2 August 2020

वांगी परीसरात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. त्यांमुळे बऱ्याच गावातील तलाव, बंधारे, ओढे आटले आहेत.

वांगी : वांगी परीसरात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. त्यांमुळे बऱ्याच गावातील तलाव, बंधारे, ओढे आटले आहेत. विहिरीतील पाण्यानेही तळ गाठला आहे. परीणामी पिके जगवायची कशी ? या विवंचनेत शेतकरी आहेत . 

कडेगाव तालुक्‍यात गेल्या वर्षी जुलै - ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता . अनेक गावातील नद्या, ओढे, बंधारे, तलाव ओसंडून वाहत होते. मुसळधार पावसामुळे अनेक गावातील रस्ते काही दिवस पाण्याखाली होते. त्यामुळे वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही.

मात्र यावर्षी पावसाळा सुरु होऊन 2 महिने उलटले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पेरलेले चांगले उगवून आले आहे. मात्र पावसाअभावी आता ते वाळू लागले आहे. खरीप पिक वाया गेले तर जनावरांच्या चाऱ्याची समस्या शेतकऱ्यांसमोर वर्षभर निर्माण होणार आहे.

त्यामुळे पशुधन जगवायचे कसे हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर गंभीर बनला आहे. शिवाय वर्षभराच्या अन्न -धान्यांची कमतरता ही शेतकऱ्यांना भासणार आहे. सध्या तालुक्‍यात सोयाबीन, भूईमूग, ज्वारी, उडीद, मका यांसह अन्य पिकांची 23 हजार 343 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाअभावी पिके वाळू लागल्याने पिके कशी जगवायची असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. तर काही ठिकाणी पावसाअभावी पिकांची ऊगवण न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 

पेरणी 23 हजार हेक्‍टरवर...  
कडेगाव तालुक्‍यात सोयाबीन ,भूईमूग, ज्वारी , उडीद , मका यांसह अन्य पिकांची 23 हजार 343 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता उगवणही चांगली आहे. या पिकांना दमदार पावसाची गरज आहे. तालुक्‍यात सध्या दरवर्षी पेक्षा यंदा पावसाचे अत्यल्प आहे. पाऊस जर वेळेत पडला नाहीतर पेरणी वाया जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी एकमेव उपाय असणाऱ्या ताकारी योजनेचे पाणी तात्काळ सोडून शक्‍य तेवढे जित्राबं वाचवण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity during monsoon in Kadegaon