esakal | बेळगावात पावसाचा जोर सुरुच ; या भागातील १५ घरांमध्ये घुसले पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Water seeped into 15 houses in belgaum Municipal Corporation has started a shelter center at Kaivalya Yoga Mandir on Mandoli Road

, २८ जणांना निवारा केंद्रात आश्रय.

बेळगावात पावसाचा जोर सुरुच ; या भागातील १५ घरांमध्ये घुसले पाणी

sakal_logo
By
मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील चौगुलेवाडी येथील 15 घरांमध्ये पाणी घुसले आहे. तेथील 28 जणांना निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले आहे. मंडोळी रोडवरील कैवल्य योग मंदीर येथे महापालिकेने निवारा केंद्र सुरू केले आहे. रविवारी (ता.16) सायंकाळी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून या निवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे. त्या घरांमध्ये घुसलेले पाणी कमी होईपर्यंत या 28 जणांची निवासाची व भोजनाची व्यवस्था निवारा केंद्रातच केली जाणार आहे. महापालिकेकडून तेथे अल्पोपहार व भोजन दिले जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्या 28 जणांना मास्क व सॅनिटायजरही देण्यात आल्याची माहिती निवारा केंद्राचे प्रमुख रवी मास्तीहोळीमठ यानी दिली. 


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव शहर व परीसरात जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी महापालिकेने शहरात चौदा निवारा केंद्रांची स्थापना केली होती. गतवर्षी अतिवृष्टीच्या काळात ज्या चौदा इमारतींमध्ये निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली होती, त्या चौदा इमारती महापालिकेने 6 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतल्या होत्या. या इमारती ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पावसाचा जोर ओसरला, तरीही पालिकेने त्या इमारतींचा ताबा आपल्याकडेच ठेवला.

हेही वाचा- ‘त्या’ एका  मेसेजमुळे मुख्य बाजारपेठेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ -

15 ऑगस्टपासून पुन्हा शहरात जोरदार पाऊस सुरू झाला. 16 ऑगस्ट पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी घुसले. सर्वात आधी चौगुलेवाडी परीसराला फटका बसला. तेथील 15 घरांमध्ये पाणी घुसले. महापालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच आपत्ती निवारण पथकाने तेथे जावून त्या कुटुंबाना स्थलांतर करण्याची सूचना दिली. काहीजण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेली. पण 28 जणांनी निवारा केंद्रात आश्रय घेण्याचे ठरविले. मंडोळी रोडवरील कैवल्य योग केंद्राच्या इमारतीत महापालिकेने निवारा केंद्र सुरू केले होते. तेथेच त्यांची रवानगी करण्यात आली.

सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे चौगुलेवाडी येथील घरांमध्ये घुसलेले पाणी कमी होवू लागले आहे. पण पाऊस पूर्ण थांबल्यानंतर व त्या घरांची स्वच्छता झाल्यानंतरच त्यांना तेथे पुन्हा संसार थाटता येणार आहे. तोवर निवारा केंद्रातच त्याना वास्तव्य करावे लागणार आहे. 

हेही वाचा- सांगलीत कृष्णाकाठी महापुराची धास्ती, पाणीपातळी 34 फुटांवर -


गतवर्षी बेळगाव शहरात अतिवृष्टीमुळे विदारक स्थिती निर्माण झाली होती. अनेक कुटुंबे विस्थापित झाली होती. त्याची पुनरावृत्ती यंदा होवू नये यासाठी महापालिकेने खबरदारी घेतली आहे. ज्या नाल्यांमुळे शहरात पूर स्थिती निर्माण झाली होती, त्या नाल्यांमधील अडथळे दूर केले आहेत. त्यामुळे नाल्यांच्या काठावरील निवासी वसाहतींमध्ये यंदा गतवर्षीप्रमाणे पूरस्थिती निर्माण झालेली नाही. पण सखल भागातील घरांमध्ये मात्र पाणी घुसले आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे विस्थापितांची संख्या कमी होण्याची शक्‍यता आहे. 

संपादन - अर्चना बनगे