आम्ही करून दाखवले : आमदार शंभूराज देसाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आता पुढच्या टप्प्यात आवश्यक त्या गाेष्टींची पुर्तता करुन आम्ही जनतेला दिलेला शब्द  पाळणार आहाेत असे आमदार शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले. 

कोयनानगर (जि. सातारा) ः कोयनानगरातील "वॉटर पार्क'च्या कामास एक कोटी, ओझर्डे धबधबा सुशोभीकरणासाठी दीड कोटी व अंबाखेळती देवी मंदिर बोपोलीतील परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख असा या कामांसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याबाबतचा आदेशही शासनाने पारित केल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकाव्दारे दिली.
 

पत्रकातील आशय असा ः कोयना धरण व धरणाच्या दहा किलोमीटरचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या विभागातील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून घेतले होते. संबंधित अंदाजपत्रक सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर केले. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी शासनाकडे आग्रही मागणी केली होती.

श्री. महाजन हे कोयना दौऱ्यावर आले असता या पर्यटनाच्या निधीसंदर्भात त्यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून या विभागाच्या कोयना सिंचन विभागामार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करण्यासाठी आवश्‍यक दोन कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.

दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखड्यात सुचवलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वातील नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण व नूतनीकरण, कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंज्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण, कोयना धरण व्यवस्थापनाच्या जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नूतनीकरण, कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था व धरणातील जलाशयात बोटिंगची व्यवस्था या कामांसाठी दोन कोटी पाच लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजूर करून तो कोयना धरण व्यवस्थापनच्या कार्यकारी अभियंत्याकडे वर्गही करण्यात आला.

कोयना पर्यटनातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोयनानगर येथे वॉटर पार्क उभारण्यासाठी एक कोटी, ओझर्डे धबधबा सुशोभीकरणासाठी दीड कोटी व अंबाखेळती देवी मंदिर बोपोली येथील परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख असा तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

करून दाखवले ः आमदार शंभूराज देसाई 

कोयना पर्यटनाच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळवून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्‍यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती, दुरुस्ती करण्यासाठी आवश्‍यक निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजूर करून आणणार असल्याचे सांगून आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ""केवळ घोषणा करत नाही, तर त्याचा पाठपुरावा करून जे ठरवतो ते करून दाखवतो, त्यानुसार कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजूर करून आणला.''

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Have Did It Says MLA Shambhuraj Desai