
Weather Update : शिराळा तालुक्यात वाढलाय उन्हाचा चटका
बिळाशी : फेब्रुवारीअखेरीस, तसेच मार्चच्या सुरवातीच्या दिवसांपासूनच शिराळा तालुक्यात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. आता एप्रिलमध्ये तर उन्हाच्या तडाख्याने कहरच केला आहे.
सकाळी दहापासूनच शरीराची लाहीलाही करणाऱ्या उन्हाला सुरवात होत असल्यामुळे शेतशिवारात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींसह विशेषतः परगावहून प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दीड-दोन किलोमीटरची पायपीट करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो आहे.
शरीरातून निघणाऱ्या सातत्याच्या घामाच्या धारेने विद्यार्थ्यांना ग्लानी, थकवा, मरगळ, अशक्तपणा जाणवू लागला आहे. काहींना चक्कर, भोवळ (डोळ्यांसमोर अंधारी येणे) आदी प्रकार सुरू झाले आहेत. विशेषत: शालेय मुलांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. नोकरवर्गही उन्हाच्या त्रासामुळे चांगलाच मेटाकुटीला आला आहे. तालुक्यात उन्हाची प्रचंड दाहकता वाढलीय. बहुतांश प्राथमिक, माध्यमिक शाळा जुन्या, कौलारू इमारतीच्या, उंचीने कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
बचावासाठी हे करा...
शक्यतो कडक उन्हातील प्रवास टाळा
दुचाकीवरून उन्हात बाहेर पडल्यास डोक्यावर टोपी वापरा
चेहरा पांढऱ्या स्कार्फने झाका
पांढरे कपडे परिधान करावेत
लिंबूसरबत, ताक आदी थंड पेयाचे सेवन करावे
उष्माघाताचा त्रास विशेषतः मानवासह पाळीव प्राण्यांनाही करावा लागतो आहे. उष्मा कमी करण्यासाठी विशेषतः मुले नदी, विहिरीवर दुपारी पोहायला जात आहेत. खिलार गाय, म्हशी, शर्यतीची वासरे यांनाही शेतकरी त्यांचा उष्मा कमी करण्यासाठी नदीवर पोहायला घेऊन जातोय.
— बाबासो मस्के, पशुपालक शेतकरी, मोरेवाडी-मांगरुळ