esakal | मध्य प्रदेशमधून जिल्ह्यात येणारा गहू थांबला...

बोलून बातमी शोधा

 Wheat stopped coming from Madhya Pradesh in district...

मध्य प्रदेशातून सांगली जिल्ह्यात येणारे गव्हाचे ट्रक अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गव्हाचा नियमित पुरवठा होण्यासाठी मध्य प्रदेशातील लोकप्रतिनिधी, खासदारांशी संपर्क साधला जाणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले.

मध्य प्रदेशमधून जिल्ह्यात येणारा गहू थांबला...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही अत्यावश्‍यक वस्तूंची देवाणघेवाण थांबली. मध्य प्रदेशातून सांगली जिल्ह्यात येणारे गव्हाचे ट्रक अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गव्हाचा नियमित पुरवठा होण्यासाठी मध्य प्रदेशातील लोकप्रतिनिधी, खासदारांशी संपर्क साधला जाणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले. शेतीची खते, औषधांसह द्राक्ष आणि भाजीपाला बाबतीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉक डाऊनच्या कालावधीतील अडचणींबाबत खासदार श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व उद्योग-व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. देशभर सर्वत्र बंद असल्याने काही ठिकाणी अत्यावश्‍यक मालाची टंचाई निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशातून सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होते. तेथून येणारे गव्हाचे अनेक ट्रक अडकले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात टंचाई निर्माण झाली असली तरी ती दूर केली जाईल. तेथील लोकप्रतिनिधी, खासदारांशी संपर्क साधून गव्हाचा पुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शेतीच्या खते आणि औषधासंदर्भातही काही टंचाई निर्माण झाली आहे. द्राक्ष आणि भाजीपाला विक्रीबाबतही समस्या आहेत. त्या कशा दूर केल्या जातील, याबाबतही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात प्रशासनाकडून आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कोरोनाचे अनेक रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्‍यक आहे.

मात्र, काही लोक अद्याप बाहेर फिरताना दिसतात. ही बाब गंभीर असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे आवाहनही खासदार पाटील यांनी केले. नागरिकांना गरजेच्या वस्तू घरात पोहोच झाल्या पाहिजेत, याबाबतही प्रशासन प्रयत्नशील असून, लवकरच मार्ग काढला जाईल. 

कोरोना रोखण्यासाठी एक कोटीचा निधी 
खासदार संजय पाटील म्हणाले, की भाजप पक्ष पातळीवरून कोरोना रोखण्यासाठी खासदार निधी देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांचा निधी लोकांसाठी खर्च करण्यासाठी एक कोटी रुपये देण्यात येत आहेत. खासदारांचे एक महिन्याचे वेतन देण्यात आले. औषधोपचार तसेच यंत्रसामग्रीसाठी अन्य एका महिन्याचे वेतनही दिले जाणार आहे.