
सांगली जिल्ह्यात साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी कोणत्याही कारखान्याने बिले वर्ग केलेली नाहीत.
नवेखेड (जि. सांगली ) : सांगली जिल्ह्यात साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला आहे. जरी पहिल्या हप्त्याची ऊस दराची कोंडी फुटली असली, तरी कोणत्याही कारखान्याने बिले वर्ग केलेली नाहीत. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये उत्सुकता ताणली आहे.
कोरोना तसेच अतिवृष्टीचे संकट घेऊन कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केले. कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होऊन एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा निघाला. संघटनेची मागणी मान्य असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी जाहीर केले. असे असले तरी काही कारखान्यांचे प्रतिनिधी हजर नव्हते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणता कारखाना एक रकमी एफआरपी देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अलीकडील काही वर्षांत दरासाठीचा शेतकरी संघटनाचा संघर्ष सौम्य बनला आहे. केंद्राने ठरवून दिलेली एफआरपी करखान्यांकडून कशी मिळेल या साठीच पाठपुरावा करावा लागत आहे. काही कारखान्यांनी गतवर्षाची एफआरपी अजूनही पूर्ण केली नसल्याची उदाहरणे आहेत.
मागील आठ दहा वर्षांत सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे ऊस दर वाढ आंदोलनासाठी आघाडीवर असायचे. आता साखर कारखान्यांना पूर्ण एफआरपी न दिल्यास कायद्याचा बडगा सरकार उगारते. ही वस्तुस्थिती आहे. कोरोना महामारी, अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांना यावर्षी गाळपासाठी जाणाऱ्या उसाची एफआरपी एकरककमी मिळावी अशी मागणी आहे. पूर्वी साखर कारखाने जादा साखर उतारा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. सध्या हा मुद्दा फारसा गांभिर्याने कोण घेत नसल्याचे चित्र आहे. फक्त गाळप कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले जातात.
विभागीय साखर सहसंचालक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मागील वर्षाचा सरासरी उतारा आणि त्या कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्च वजा जाता येणारी रक्कम हा त्या कारखान्याचा एकूण दर बसतो. ही माहिती पडताळणी केली असता, हा प्रति टन 2500 ते 3100 पर्यंत हा दर जातो. काही कारखाने जादा ऊस गळीतास मिळावा यासाठी चढा दर देतात. असे असले तरी हा दर प्रति टन 50 ते 100 इतकाच पुढे मागे असतो. यावर्षी विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी मिळणार का याची उत्सुकता आहे.
परंपरा दराची...
सांगली जिल्ह्यात हुतात्मा, राजाराम बापू, क्रांती हे साखर कारखाने नेहमी चांगल्या दरासाठी चर्चेत आहेत. त्याचबरोबर सोनहिरा, विश्वास, दत्त इंडिया (शेतकरी सांगली) निनाईदेवी, मोहनराव शिंदे, उदगिरी शुगर, राजेवाडी, दालमिया शुगर या साखर कारखान्यांनी बऱ्यापैकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
कारखानदारांनी शब्द पाळावा
14 दिवसांत गाळप झालेल्या उसाचे बिल द्यावे असा कायदा आहे. आता एक महिना होत आला आहे. कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देऊन दिलेला शब्द पाळावा.
- भागवत जाधव, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
संपादन : युवराज यादव