शिवेंद्रसिंहराजेंची "हद्द'पार; पण "हद्द'वाढ कधी ? 

विशाल पाटील
Friday, 2 August 2019

मागील आठवड्यात पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव परत आला होता. त्यातील काही त्रुटी दूर करून त्यांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा प्रस्ताव पुढील आठवड्यात नगरविकास विभागाकडे जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या हद्दवाढीबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

सातारा : एके काळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेल्या सातारा शहराने मराठा साम्राज्याचा झेंडा आटकेपार रोवला. मात्र, त्याच सातारा शहराला तब्बल 51 वर्षे हद्दवाढ करता आली नाही, हे राजकीय दुर्दैव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर, मतदारसंघाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीची "हद्द'पार करत भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी सातारा शहराची "हद्द'वाढ कधी करणार? याचे ठोस उत्तर मिळायला हवे. 
सातारा पालिकेची स्थापना 1851 मध्ये झाली. त्यानंतर 1882 मध्ये गोडोली, सदरबझार व कॅम्प परिसरातील लहान नगरपालिकांची (सबअर्बन म्युन्सिपल) स्थापना झाली. 1968 मध्ये सातारा पालिकेचा विस्तार होत हा भाग सातारा पालिकेत समाविष्ठ झाला. मात्र, त्यानंतर अद्यापही साताऱ्याची हद्दवाढ झालेली नाही. 1977 मध्ये हद्दवाढ प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर हद्दवाढीबाबत अनेकदा फेरबद्दल करण्यात आले. एवढेच नव्हे, तर चक्‍क 22 मार्च 2017 रोजी चौथ्यांदा हद्दवाढीची अधिसूचना काढण्यात आली. त्यावर हरकती मागवून जानेवारी 2018 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात अनेकदा आले. त्या वेळी त्यांनी हद्दवाढीची भेट सातारकरांना देणार असल्याचे एका राजकीय व्यासपीठावर जाहीर केलेले होते. मात्र, त्याला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव देऊन तब्बल 42 वर्षे उलटली, तरीही साताऱ्याची हद्दवाढ झाली नाही. त्यामुळे शहरालगत शाहूनगर, जगतापवाडी, शाहूपुरी बाजूकडील काही भाग आदी त्रिशंकूच राहिला आहे. त्यामुळे तेथील विकास खुंटला आहे. शिवाय, या मुद्‌द्‌यांचे अनेकदा राजकारणही झाले आहे. त्रिशंकू भागाचा विस्तार मोठा असतानाही तेथे निधी अपुरा मिळत असल्याने निधी अपुरा पडतो आहे. परिणामी तेथे पायाभूत सुविधांचाही वानवा आहे. 
शिवेंद्रसिंहराजेंनी सातत्याने सातारा शहराच्या हद्दवाढीच्या बाजूने भूमिका घेतली आहे. यांसह विविध प्रश्‍नांसाठी त्यांनी काल भाजपमध्येही प्रवेश केला आहे. सहाजिकच हा प्रश्‍न ते कधी मार्गी लावणार, याकडे सातारा शहरासह त्रिशंकू भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will be satara city border extension