esakal | कुठल्या जिल्ह्यात लुटली साडेतीन हजार ब्रास वाळू?

बोलून बातमी शोधा

 In which district three and a half thousand brass sands were looted

बांधकाम क्षेत्रात कृष्णा, वारणा, येरळा नद्यांमधील वाळूला मोठी मागणी असते. वाळूचे ठेके घेण्यासाठी चढाओढ असते. त्यातून अनेक हल्लेही झाले आहेत.

कुठल्या जिल्ह्यात लुटली साडेतीन हजार ब्रास वाळू?
sakal_logo
By
अमोल गुरव : सकाळ वृत्तसेवा

सांगली : लॉकडाउनमध्ये जिल्हा प्रशासन कोरोना लढाईत गुंतले असताना जिल्ह्यात वाळू तस्करी जोमात सुरु आहे. जिल्ह्यात 67 दिवसात तब्बल साडेतीन हजारांपेक्षा जास्त ब्रास वाळूची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यातून शासनाचा दीड कोटींचा महसूल बुडाला. राजकीय वरदहस्त, प्रचंड पैसा यामुळे तस्कर बेफाम झाले आहेत. ठेकेदारांची मजल तहसीलदारांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहे. 

बांधकाम क्षेत्रात कृष्णा, वारणा, येरळा नद्यांमधील वाळूला मोठी मागणी असते. अग्रणी, बोर, नांदणी, माणगंगा नदी, सोनहिरा, बागलवाडी, ढोणची ओढा, आटपाडी तलाव, रेबाई तलाव येथील वाळूचे ठेके घेण्यासाठी चढाओढ असते. त्यातून अनेक हल्लेही झाले आहेत. लॉकडाउन सर्व व्यवहार बंद झाले. महसूल प्रशासन कोरोनाच्या व्यवस्थापनात गुंतले. याचाच फायदा तस्करांनी उठविला. रात्रंदिवस जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा झाला. त्याने कडेगाव, पलूस, तासगाव तालुक्‍यात येरळेच्या पात्राची चाळण झाली. पात्रात मोठे खड्डे पडले. रात्री ट्रॅक्‍टर, डंपरच्या सहाय्याने तस्करी होते. टाळेबंदी बांधकाम बंद होती; मात्र वाळू तस्करी सुरु होती. गावांच्या हद्दी बंद होत्या. पोलिस तेल घालून अहोरात्र पहारा देत होते आणि तरीही वाळु तस्करी होती. होती. 

हे पण वाचा - समुद्र वाचवण्यासाठी मंथन ; समुद्री अधिवास, जैवविविधता, अन्नसाखळी येतेय धोक्यात... -

शिवारात मारले डेपो 
तस्करांनी शिवारांमध्ये वाळुचे साठे केले आहेत. पीकांमध्ये ते अदृश्‍य आहेत. काही ठेकेदारांनी माळावरील शेत जमिनी भाडेपट्ट्यावर घेवून तेथे डेपो केले आहेत. पत्रा ठोकून आतमध्ये वाळू साठवली आहे. लॉकडाउननंतर वाळूचे दर वाढणार असल्याने आधीच्या साठ्यात ही भर केली आहे. 

वाळूतुन तिप्पट पैसा 
प्रत्येक जिल्ह्यात वाळूची प्रति ब्रास रॉयल्टी वेगवेगळी असते. जिल्ह्यात वाळूसाठी चार हजार 400 रॉयल्टी निश्‍चित आहे. सध्या वाळूचा दर ब्रासला 9 ते 10 हजार आहे. वाहतूक खर्च वजा जाता थेट दुप्पट पैसा सरळ मार्गानेही मिळू शकतो. रॉयल्टी चुकवून हप्ते सुरु करून दुप्पट तिप्पटीने नफा मिळवला जात आहे. दुसरीकडे एकाच क्रमांकाच्या अनेक ट्रक्‍समधून एकाच रॉयल्टी पावतीवर अनेक ट्रक वाळू उपसा होत असतो. 

       असा बुडाला महसूल 

  • लॉकडाऊन काळ - 67 दिवस 
  • वाळू उपसा- साडेतीन हजार ब्रास 
  • महसूल बुडाला -1 कोटी 54 लाखांचा 

          या गावातून तस्करी 

  • कडेगाव ः अमरापुर, वडीयरायबाग, शिवणी, शळकबाव, वांगी, भाळवणी, रामापूर 
  • जत ः संख, करजगी, सोनलगी, सुसलाद,उमदी, जलिहाळ खुर्द, सिध्दनाथ, खंडनाळ 
  • तासगाव ः ढवळी, राजापूर, निमणी, तुरची, नागाव, बिंद्री, शिरगाव 
  • पलूस ः आंधळी, मोराळे, राजापूर, वाझर, वसगडे, नांद्रे, अंकलखोप, भिलवडी, आमणापूर,         बुर्ली, दह्यारी घोगाव 
  • आटपाडी ः कौठुळी, बोंबेवाडी, दिघंची, शेटफळे आटपाडी (रेबाई तलावातून) 
  • खानापूर ः बलवडी, आळसंद, हिंगणगादे, भाळवणी, भिकवडी ब्रुद्रक 
  • कवठेमहांकाळ ः लोणारवाडी, अग्रण धुळगाव, हिंगणगाव, पांडेगाव 

"येरळेतील वाळू उपसा थांबवण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांचे पथक तयार केले आहे. या काळात गावच्या वाळू उपसा प्रतिबंधक समितीनेही चोरून वाळू उपसा करणाऱ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. ग्रामस्थांनी माहिती कळवावी. कठोर कारवाई करू.`` 
ऋषीकेत शेळके, तहसीलदार, खानापूर 

हे पण वाचा -  पलूस  शहरात कोरोनाचा शिरकाव