विधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणी कोणी लावली आहे फिल्डींग ?

निवास चौगले  
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे.

कोल्हापूर  - विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यात विधानसभेत पराभूत झालेल्या किंवा पक्षासाठी झटलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्तेतील तिन्हीही पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला येतील. 

पुढील वर्षी जून महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सहा वर्षाची मुदत संपत आहे. यापैकी कॉंग्रेसचे साताराचे आमदार आनंदराव पाटील यांनी यापुर्वीच राजीनामा देऊन भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादीचे राहूल नार्वेकर व रामराव वडकुते यांनी पक्षाचा राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवली, त्यात दोघेही विजयी झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची एक व राष्ट्रवादीच्या दोन अशा तीन जागा यापुर्वीच रिक्त झाल्या आहेत. 

शशिकांत शिंदे विधानपरिषदेवर ?

राष्ट्रवादीच्या रिक्त दोन जागांपैकी एका जागेवर कोरेगांव विधानसभा मतदार संघातून धक्कादायकरित्या पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांची नक्की वर्णी लागणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिमागे श्री. शिंदे खंबीरपणे उभे होते. ज्यावेळी राज्य बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस श्री. पवार यांना आली, त्याच दरम्यान माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर श्री. शिंदे यांनी या कारवाईचा निषेध केला होता. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर निवड निश्‍चित समजली जाते. 

कोल्हापूर जिल्ह्यात यांची नावे चर्चेत

जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांचीही नांवे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येतील यापैकी दोन जागा रिकाम्या असल्या तरी श्री. शिंदे यांना एक जागा द्यावी लागेल. उर्वरित एका जागेसाठी या दोघांचे प्रयत्न असतील. कॉंग्रेसकडून विधान परिषदेवर जाण्यास जिल्ह्यातील फारसे कोणाचे नांव चर्चेत नाही. जिल्ह्यात कॉंग्रेसचे चार आमदार आहेत आणि विधानपरिषदेत जाण्याची इच्छा असलेल्यांची संख्याही नगण्य आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार पराभूत झाले. त्यात कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे.

संजय पोवार यांनाही संधी मिळण्याची शक्यता

श्री. क्षीरसागर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद असले तरी हे पद केव्हाही जाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांनीही राज्यपाल नियुक्त आमदारांतून विधानपरिषदेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. शिवसेनेच्या इतर पराभूत आमदारांत थेट उध्दव ठाकरे यांच्याशी घनिष्ट संबंध असलेले कोणी नाही. त्यामुळे आण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय पोवार यांनाही संधी मिळू शकते, त्यांनीही यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते. 

कशी होते ही निवड

राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री हे राज्यपालांना संबंधित व्यक्तींची यादी सादर करतील आणि त्याला राज्यपाल यांनी मंजुरी दिल्यानंतर संबंधितांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती होईल. या प्रक्रियेसाठी प्राधान्याने पक्षाशी एकनिष्ठ आणि पक्ष कार्यासाठी झटलेल्यांचा विचार करतानाच जातीय आणि विभागाचा समतोलही राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासारख्या राज्यपाल नियुक्त काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

जून 2020 मध्ये यांच्या जागा होणार रिक्त

हुस्नबानू खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर-सर्व कॉंग्रेस, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, राहूल नार्वेकर, ख्वाजा बेग, रामराव वडकुते, जगन्नाथ शिंदे- सर्व राष्ट्रवादी, प्रा. जोगेंद्र कवाडे-आरपीआय

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which Leaders Interested To Go On Legislative Council