कोण होते "आयर्विन', ज्यांच्या नावे उभा आहे सांगलीत कृष्णा नदीवरील पूल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

कृष्णा नदीला पूर आलाय... महापूर येण्याची भिती आहे... पाणी 45 फुटांवर गेले की धोका पातळी ओलांडली म्हणायचं... 50 फुटांवर गेली की ठोका चुकला म्हणून समजा... 57 फुटांवर काय होते, ते गेल्यावर्षी साऱ्यांनी पाहिलेच... किती फूट वाढलंय... किती वाढेल हे कुठं तो पूल 90 वर्षे जुना आहे. त्याचं नाव आयर्विन पूल. या पुलाची आणि त्याला ज्यांचं नाव आहे, त्या लॉर्ड आयर्विन यांची गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. 

सांगली ः कृष्णा नदीला पूर आलाय... महापूर येण्याची भिती आहे... पाणी 45 फुटांवर गेले की धोका पातळी ओलांडली म्हणायचं... 50 फुटांवर गेली की ठोका चुकला म्हणून समजा... 57 फुटांवर काय होते, ते गेल्यावर्षी साऱ्यांनी पाहिलेच... किती फूट वाढलंय... किती वाढेल हे कुठं तो पूल 90 वर्षे जुना आहे. त्याचं नाव आयर्विन पूल. या पुलाची आणि त्याला ज्यांचं नाव आहे, त्या लॉर्ड आयर्विन यांची गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. 

कृष्णा ही भारतातील प्रमुख नदी. या नदीला वारणा, पंचगंगा, दूधगंगा, येरळा, अग्रणी, कुडाळी, वेणा, कोयना, मोरणा, कडवी, शाली, कासरी, गरवाली अशा कित्येक उपनद्या मिळतात. तर या नदीला सन 1914 आणि सन 1916 साली प्रलयकारी महापूर आला होता. सांगलीचा इतिहास तसा उणापुरा दोनशे वर्षांचा. सहा गल्ल्यांची ही नगरी. त्यावेळी महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असायला हवी, अशी चर्चा समोर आली. तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला. इ.स. 1927 साली पुलाचे बांधकाम सुरु झाले आणि इ.स. 1929 साली ते पूर्ण झाले. संस्थानच्या खर्चातून तो बांधला गेला. भव्य आणि दिव्य असा हा पूल केवळ वाहतुकीची व्यवस्था बनून नव्हे तर सांगलीची शान बनून उभा राहिला. स्थापत्य कलेचा एक अत्यंत शानदार नमुना म्हणून तो ओळखला जातो. त्याला 90 वर्षे झाली, मात्र त्याची शान आजही तशीच कायम आहे. कारण, त्यामागचे कष्ट. त्याकाळचे प्रामाणिक अभियंते, कष्टाला वाहून देणारे मजूर... आज या पुलावरील फुटाफुटाची चिन्हे पाण्याची उंची दर्शवतात. त्यावर येथे पूर येणार की महापूर याचा अंदाज येतो. हा पूल कधीच पाण्याखाली गेला नाही, कदाचित जाणारही नाही.

 
या पुलाचे उद्‌घाटन झाले ते तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते. त्यांचेच नाव या पुलाला देण्यात आले. 3 एप्रिल 1926 साली लॉर्ड आयर्विन यांची ब्रिटिश साम्राज्याचे भारतातील तिसावे व्हाईसराय आणि गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. ते सन 1931 पर्यंत भारतात होते. या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला वेग आला होता. सायमन कमीशन, पूर्ण स्वराज्याची मागणी, दांडी यात्रा, बॅ. जीना यांनी समोर आणलेले 14 मुद्दे आणि बऱ्याच गोष्टी लॉर्ड आयर्विन यांच्या कारकिर्दीत घडल्या. 1932 ला त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली. ते काही काळ ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर होते. 1959 ला त्यांचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who was "Irwin", whose name stands on the bridge over the river Krishna in Sangli