सांगलीचा महापौर कोण? ऑनलाईन सभेत आज फैसला

Who will be Mayor of Sangli? Decision in the online meeting today
Who will be Mayor of Sangli? Decision in the online meeting today

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सत्तेचा फैसला आज (ता. 23) होणार आहे. मागील चार दिवस रंगलेला सदस्यांच्या फुटीचा, उमेदवारीचा सस्पेन्स उद्या खुला होणार आहे. सत्ताधारी भाजपमधील सात सदस्य नॉटरिचेबल, नगरसेवकांची नाराजी; शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील महापौरपदाच्या उमेदवारी या साऱ्याचा घोळ आजही कायम राहिला. त्यामुळे या सगळ्या राजकीय नाट्यावरचा पडदा मंगळवारीच महापौर निवडीच्या विशेष सभेतच उघडला जाणार आहे.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी आज सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन ऍपद्वारे विशेष सभा होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी हे सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. प्रथमच ऑनलाईन सभेत महापौरपदासाठी मतदान होणार असल्याने याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी, कॉंग्रेसमधून उत्तम साखळकर; तर राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून गजानन मगदूम, कॉंग्रेसकडून उमेश पाटील, तर राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी व सविता मोहिते यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

स्वळावर सत्तेत आलेल्या भाजपला अडीच वर्षांतच सत्ता वाचवण्याची वेळ आली आहे. भाजपचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यापैकी दोघेजण स्वगृही परतले; तर अजूनही सातजण नॉटरिचेबल आहेत. मात्र हे सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आमचाच महापौर होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचे नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात असून, महापालिकेत सत्तांतर होऊन आमचा महापौर, उपमहापौर होईल असा दावा केला. 

आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या 
विजय बंगल्यावर आज कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार तसेच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची दिवसभर चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत महापौरपदाच्या उमेदवारीचा घोळ आजही कायम राहिला. मात्र सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. महापौरपदावर कॉंग्रेसने उत्तम साखळकर यांचा दावा कायम ठेवला आहे, तर राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. याबाबत अधिकृत घोषणा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम उद्या सकाळी करणार आहेत. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापुरात 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले. कॉंग्रेसच्या नॉटरिचेबल गटाचे सदस्यही सोबत होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याचे समजते. उद्या कोल्हापुरातील हॉटेलच्या हॉलमध्ये थांबून तेथूनच ते ऑनलाईन महासभेत सहभागी होणार असल्याचे समजते. 

भाजचे सदस्य सांगलीत येणार 
भाजपचे 27 सदस्य गोवा सहलीवर गेले होते. ते कोल्हापूर येथे एका हॉटेलवर परतले. तेथे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. आज सकाळी हे सर्व नगरसेवक सांगलीत परतणार असून, खरे क्‍लब हाऊस येथे थांबून ऑनलाईन सभेत सहभागी होणार आहेत. 

अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स 
महापौरपदाच्या उमेदवारीबाबत कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा घोळ सुरु राहिला. मात्र सव्वा वर्षाचा फॉम्युला मान्य झाल्यास पहिली संधी राष्ट्रवादीला देण्यात येण्याची शक्‍यता असून, महापौरपदासाठी दिग्विजय सूर्यवंशी; तर उपमहापौरपदासाठी उमेश पाटील यांच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजित कदम हे उमेदवारी आज सकाळी जाहीर करणार असल्याने उमेदवारी नेमकी कुणाला याचा सस्पेन्स अखेरच्या क्षणापर्यंत राहणार आहे.

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com