कोण ठेवणार 100 फूट उंचावरून महापूरावर नजर? वाचा... 

Who will keep an eye on the flood from a height of 100 feet
Who will keep an eye on the flood from a height of 100 feet

सांगली : कृष्णा नदीकाठी वसलेल्या सांगलीत महापुराचे पाणी शिरायला लागल्यानंतर जी भंबेरी उडते ते 2005 आणि 2019 ला साऱ्यांनीच अनुभवली आहे. पाण्याचा नेमका वेढा कसा पडतोय, कुठून पाणी वाढतेय, कुठे लोक अडकले आहेत, काय व्यवस्था आहे, याची माहिती घेताना यंत्रणा कोलमडलेली दिसते. त्यात समन्वय रहात नाही. या साऱ्या प्रश्‍नांवर एकच उत्तर ठरावे, अशी व्यवस्था महापालिकेने राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येथील मल्टिप्लेक्‍ससह एकूण अठरा ठिकाणी उंच इमारतीवर अतिउच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. तब्बल 100 फूट उंचावरून कॅमेरे महापुरावर लक्ष ठेवतील आणि सुमारे तीन किलोमीटरपर्यंतची स्थिती झूम करून पाहता येईल. 

सन 2005 आणि 2019 या दोन महापुरापासून धडा घेत महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज करण्यास प्रारंभ केला आहे. पूरग्रस्त भागावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहेच, त्याचबरोबर आपत्ती मित्र नावाचे ऍपही तयार करण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांना पुराची माहिती मिळेल तसेच पूरग्रस्तांना मदतही तातडीने मिळण्यास सहकार्य होणार आहे. जिल्ह्याला गेल्या पंधरा वर्षांत दोन वेळा महापुराचा फटका बसला होता. सन 2005 मध्ये आलेल्या महापुरापेक्षा भयंकर अवस्था 2019 मध्ये आलेल्या महापुराने झाली होती. दोन्ही वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळण्यात अडचणी आल्या. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोलमडली. यांत्रिकी बोटी आणि लाईफ जॅकेटची कमतरता, मदत आणि निवारा केंद्रातही सुसूत्रतेचा अभाव होता. या सर्वांतून धडा घेत यंदा संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सुसज्ज करण्यावर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी भर दिला आहे. 

सांगली आणि मिरेजला वळसा घालून गेलेल्या कृष्णेची पातळी पुराच्या काळात वेगाने वाढते, असा अनुभव दोन्ही वेळेला आला. त्यामुळे पूरग्रस्त भागात कधी आणि कोणत्या वेळी पाणी घुसेल, याचा अंदाज न आल्याने गेल्या वर्षी हजारो नागरिक महापुराच्या वेढ्यात अडकले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात अनेक अडचणी येत गेल्या. त्यावर मात करून महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी महापुराचा सामना केला होता. 

आपत्ती मित्र ऍप 
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपत्ती मित्र ऍप विकसित करून घेतले. याद्वारे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घरबसल्या महापुराची माहिती मिळेल. आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी, मिरजेतील कृष्णा घाटाजवळ पाणीपातळी कळेल. पुराचे पाणी शहरातील कुठल्या भागात घुसले आहे, याची माहिती मिळेल. 

ऍपवर मदत, निवारा केंद्र, तक्रारीचीही सुविधा 
आपत्ती मित्र' ऍपवरून महापालिकेने पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या मदत आणि निवारा केंद्राची माहिती मिळेल. पूरग्रस्तांना निवारा केंद्रात प्रवेश देताना त्यांची नोंदणी ऍपवर होईल. नागरिक कुठल्या केंद्रात आहे हे सहज कळेल. केंद्रात येणाऱ्या मदतीची माहिती छायाचित्रासह ऍपवर नोंद होईल. महापालिकेच्या वेबसाईटची लिंकही दिली आहे. ऍपवर तक्रारही नोंदवता येईल. 

या 18 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे 
सांगली आयर्विन पूल, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, न्यू प्राईड मल्टिप्लेक्‍स, हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉट, साई मंदिर रामनगर, टिंबर एरिया फायर स्टेशन, रेवणी रोड फायर स्टेशन, सांगलीवाडी बौद्ध वसाहत, बाळूमामा मंदिराजवळ, मिरज कृष्णा घाट, मिरज मार्केट फायर स्टेशन. या ठिकाणी प्रत्येकी एक तर शामरावनगर, दत्तनगर व मगरमच्छ कॉलनीत प्रत्येकी दोन कॅमेरे बसवले जाणार आहेत. दोन प्रमुख चौकातही कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. 

अशी असणार साधनसज्जता 
0 महापालिकेकडे सात यांत्रिकी बोटी, आणखी दोन येणार. 
0 एक हजार लाईफ जॅकेट खरेदी करणार. 
0 यंदा पाच ठिकाणी बोट हाऊस उभारणार. 
0 सांगलीवाडी, कर्नाळ रस्ता, टिळक चौक, रामनगर (होंडा शोरूमजवळ) आणि मिरजेत   कृष्णा घाट येथे बोट हाऊस. 
0 प्रत्येक ठिकाणी एक बोट व तीन ते चार प्रशिक्षित कर्मचारी असतील. 


महापुराची माहिती नागरिकांना मिळावी, तसेच पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळावी यादृष्टीने महापालिकेने आपत्ती मित्र ऍप तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारे महापुरासाठी महापालिकेने तयार केलेले हे राज्यातील पहिलेच ऍप असणार आहे. 
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com