लोकशाहीतील "राजे' काैल काेणाला ? अवघ्या काही तासांत समजणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

जल्लोष, गुलाल, मिरवणुकांची तयारी सुरू; कार्यकर्त्यांत भरलंय तुफान. 

सातार  : लोकसभा पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी उद्या (गुरुवार, ता. 24) होणार असल्यामुळे खासदार आणि आमदार कोण, यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. लोकशाहीतील "राजां'नी आपला कौल ईव्हीएममध्ये बंद केला असून, तो खुला झाल्यानंतर कोणाच्या पारड्यात जास्त गेला आहे, हे स्पष्ट होणार आहे. चुरशीतील उमेदवारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना विजय आपलाच होणार असल्याचा ठाम विश्‍वास असल्याने त्यांनीही जल्लोष, मिरवणुकांची तयारी सुरू केली आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात असल्याने ती अतिशय प्रतिष्ठेची बनलेली आहे. तसेच सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे दीपक पवार, वाईत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, भाजपचे मदन भोसले, कोरेगावातून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, महायुतीचे महेश शिंदे, कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, महायुतीचे धैर्यशील कदम, अपक्ष मनोज घोरपडे, कऱ्हाड दक्षिणमधून कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे अतुल भोसले, अपक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर, पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर, माणमधून भाजपचे जयकुमार गोरे, आमचं ठरलंय आघाडीचे प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे शेखर गोरे, फलटणमधून राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण, महायुतीचे दिगंबर आगवणे यांच्यात अत्यंत चुरशीचा असा सामना झाला.
 
सर्वच उमेदवारांत तुल्यबळ लढती झाल्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते आपलाच विजय कसा होईल, हे पटवून सांगताना दिसत आहेत. शिवाय, त्यांनाही आपल्या उमेदवाराच्या विजयाबाबत ठाम विश्‍वास वाटत असल्याने त्यांनी विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी तयारीही सुरू केल्या आहेत. 

 मीडियावर विजयाची धून 

निकालापूर्वीच अनेक उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाल्याचे "इमेज' तसेच व्हिडिओ बनविले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर प्रसारितही केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाबद्दल आश्‍चर्यही व्यक्‍त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will know the "kings" of democracy? In just a few hours