
शेतकरी आपली गवत गंजी स्वतःहून का जाळत आहेत ?
बेळगाव : गवत खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आपली गवत गंजी शिवारातच स्वतःहून जाळत आहेत. मागील दोन वर्षापासून ही स्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शहापूर, अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव शिवारात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मळणीनंतर हे गवत शेतकरी शेतातच ठेवून देतात. उन्हाळ्यात हिरे बागेवाडी, महाराष्ट्र चंदगड तालुका व बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पशुपालक शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून या शिवारातील गवत गंजी खरेदी करतात. प्रतिएकरी गवत गंजीला पाच ते सात हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळतो. पण मागील दोन वर्षापासून सारा खरेदीकडे पशुपालक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे हा चारा शेतातच पडून राहत आहे.
त्यामुळे शेतातील जागाही व्यापली जात असून पीक घेण्यात अडचणी येतात. यासह पावसाळ्यात हा चारा कुजून जातो. ही समस्या टाळण्यासाठी शेतकरी आपल्याच चाऱ्याला जाळत असून ही राख शेतामध्ये टाकून देत आहेत. मागील तीन वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा अवेळी पावसामुळे मशागत देखील लांबली असून पेरणी हंगाम देखील लांबणार आहे. अवेळी पावसामुळे शेतातील गवत गंजी कुजण्याची भीती असल्यामुळे शेतकरी या गवत गंजीला आग लावत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
Web Title: Why Are Farmers Burning Their Own Hay Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..