
Miraj Central Railway : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मिरजेतील कॉर्डलाइनसाठी सुमारे १२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याचा मिरज जंक्शनला थेट काडीचाही लाभ होणार नाही. केवळ जंक्शनवरील दक्षिणेकडून येणाऱ्या काही गाड्यांचा ताण कमी होईल. इंजिन बदलण्याचा वेळ वाचेल, मात्र मिरज जंक्शनच्या पायाभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. शेजारील सोलापूर आणि बेळगाव रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला, मिरजेला मात्र वंचित राहावे लागले. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या प्रमुख जंक्शनला सवतीचा भाव का दिला जातोय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ यासाठी संघर्ष सुरू आहे. प्रवासी संघटन सतत मागणी करत आल्या आहेत. मंत्री, अधिकारी साऱ्यांशी संवाद साधला गेल्या, मागण्या केल्या गेल्या, मात्र प्रश्न काही सुटायला तयार नाहीत. देशातील अनेक जंक्शन आणि स्थानकांचे रुपडे पालटले जात असताना मिरजकरांनी काय घोडे मारले आहे? दिल्लीत मिरजेची ताकद कमी पडते का, या प्रश्नाचे उत्तर एकदा शोधावे लागेल.