esakal | प्रवासी असूनही रेल्वे का नाही?  कोल्हापूर, सोलापूर, पुणे मार्गावर तातडीने गाड्यांची गरज 
sakal

बोलून बातमी शोधा

 Why not a train despite being a passenger? Urgent need for trains on Kolhapur, Solapur, Pune route

सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकातील प्रवांशाची मागणी असूनही रेल्वे प्रशासनाकडून कोल्हापूर, सोलापूर, हुबळी आणि पुणे मार्गावर गाड्या सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.

प्रवासी असूनही रेल्वे का नाही?  कोल्हापूर, सोलापूर, पुणे मार्गावर तातडीने गाड्यांची गरज 

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज (जि . सांगली) ः सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकातील प्रवांशाची मागणी असूनही रेल्वे प्रशासनाकडून कोल्हापूर, सोलापूर, हुबळी आणि पुणे मार्गावर गाड्या सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. प्रवासासाठी लोक बाहेर पडले आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळे रेल्वेसारख्या स्वस्त आणि सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक असूनही रेल्वे प्रशासनाकडे लोकप्रतिनीधींकडूनही पाठपुरावा होत नसल्याची प्रवासी संघटना आणि सामान्य प्रवाशांची तक्रार आहे. 

कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेची वाहतूक सध्या हळूहळू रुळावर येते आहे; पण यामध्ये कोठेही सांगली, मिरज, हुबळी, पुणे मार्गावरील प्रवाशांच्या नेमक्‍या गरजेचा रेल्वे प्रशासनाने दखलच घेतलेली नाही. सध्या कर्नाटकातील हुबळीपर्यंत आणि सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या मार्गांवर बऱ्यापैकी प्रवाशांची चांगली वर्दळ सुरू झाली आहे. याचा ताण एसटी महामंडळावर येतो आहे. कोल्हापूर मार्गावर तर मिरजेहून जाण्यासाठी एसटीमध्ये गर्दी होते आहे. प्रवाशांची गर्दी पाहून महामंडळ जादा गाड्याही सोडते आहे. बेळगाव आणि सोलापूर मार्गावरी हीच स्थिती आहे. 

पुणे मार्गावरही किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, साताऱ्यासह अन्य छोट्या गावांपर्यंत जाण्यासाठीही सोयीस्कर गाड्या नसल्याने रेल्वे हा एकमेव पर्याय प्रवांशासमोर आहे. या तीन प्रमुख मार्गांवर सध्या किमान दहा ते पंधरा हजार प्रवाशांची नियमितपणे गैरसोय होते आहे. मात्र याची जाणीव सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह कर्नाटकातील लोकप्रतिधींना नाही.

त्यांच्याकडून काही प्रयत्न झाले असतील, मात्र याबत किमान चर्चा तरी घडून येणे आवश्‍यक आहे. पण तसे काही घडत नसल्याने रेल्वे प्रशासनही या परिसरातील प्रवाशांच्या सोयीबाबत गंभीर नाही. त्यामुळे आगामी दिवाळसणातही सांगली, कोल्हापूर, हुबळी, सोलापूर, पुणे मार्गावर गाडी सोडणे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनात नसल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय अटळ आहे. 

सुरू असलेल्या गाड्या 

 • कोल्हापुर मुंबई कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस 
 • कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेस 
 • हुबळी मुंबई हुबळी एलटीटी एक्‍स्प्रेस 
 • तिरुपती कोल्हापूर तिरुपती एक्‍स्प्रेस 
 • वास्को निजामुद्दीन वास्को एक्‍स्प्रेस 
 • याशिवाय अजमेर, गांधीधाम, निजामुद्दीन या साप्ताहिक गाड्याही सध्या सुरू आहेत. 

मागणी असलेल्या गाड्या 

 • पुणे कोल्हापूर पुणे पॅसेंजर 
 • मिरज हुबळी मिरज पॅसेंजर 
 • मिरज परळी मिरज पॅसेंजर 
 • कोल्हापूर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍स्प्रेस 
 • कोल्हापूर मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्‍स्प्रेस 
 • कोल्हापूर बेंगलोर राणी चन्नम्मा एक्‍स्प्रेस 

गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न

सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आपण स्वतः याबाबत प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने मागणी असलेल्या सहा गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत 
- सुरेश खाडे, आमदार 

संपादन :  युवराज यादव