वसंतदादा शासकीय रुग्णालयातील "ऑक्‍सिजन प्लान्ट'चे घोडे कुठे अडले?कोरोना संकटात निकड

why 'Oxygen Plant' at Vasantdada Government Hospital get stuck?
why 'Oxygen Plant' at Vasantdada Government Hospital get stuck?

सांगली : येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयासाठी दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या अत्याधुनिक "ऑक्‍सिजन प्लान्ट'ची स्थिती "हत्ती गेला अन्‌ शेपूट राहिले' अशी झाली आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 10 टक्के काम अडल्यामुळे कोरोनासारख्या संकट काळात ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात अडचणी कायम आहेत. याबाबत गांभीर्याने हालचाली करून शासकीय रुग्णालय ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत सुसज्ज करण्याची गरज आहे. 


कोरोना काळात ऑक्‍सिजनची कमतरता सर्वत्र जाणवून आली. अनेक ठिकाणी ऑक्‍सिजन प्लान्ट उभारण्यात आले. खासगी रुग्णलयात आधुनिक यंत्रणेद्वारे उपचार केले जातात. त्याच धर्तीवर शासकीय रुग्णालयातही गेल्या वर्षांपासून आधुनिक यंत्रणेद्वारे उपचार केला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी मोठा आधार या शासकीय रुग्णालयात वाटतो. जिल्ह्यातीलच नव्हे, तर कर्नाटक, कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी दररोज येतात. गेल्या काही वर्षांपासून दर्जेदार उपचार पद्धतीमुळे रुग्णांमध्ये सामाधानाचे वातावरण आहे. 


आधुनिक यंत्रणेद्वारे गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यासाठी यापूर्वीच "सेंट्रलाइज ऑक्‍सिजन सप्लाय सिस्टिम' बसविण्यात आली. परंतु तरीही शंभर टक्के वापर होत नाही. सिलिंडरद्वारेच पुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी रुग्णालय प्रशासनावर लाखोंचा भार पडतो. यासाठी ही आधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी "लिक्विड ऑक्‍सिजन प्लान्ट' मंजूर करण्यात आला. यासाठी एक कोटी 37 लाख 27 हजार 884 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून याचे काम संथ गतीने सुरू आहे. दररोज सुमारे 50 रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागते. सुमारे 100 सिलिंडर दररोज लागतात. त्याचा नाहक खर्च प्रशासनावर पडत आहे. 

अशी असेल यंत्रणा 
आधुनिक यंत्रणेद्वारे ऑक्‍सिजनची निर्मिती करून एका मोठ्या टाकीत त्याचे संकलन केले जाणार आहे. टाकीत साठवलेला ऑक्‍सिजन लिक्विड स्वरूपात असेल. टाकीची साठवण क्षमता 13 हजार किलो आहे. त्यानंतर गरजेनुसार वायूरूपात रुपांतरित करून सेंट्रलाइज सिस्टिमद्वारे तो अतिदक्षता विभाग आणि वॉर्डपर्यंत हा ऑक्‍सिजन पोहोचवला जाईल. जेणेकरून याकामी सिलिंडरवर अवलंबून रहावे लागणार नाही. 

महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित

सांगलीतील शासकीय रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लान्टचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे बाकी असून ती युद्धपातळीवर सुरू आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे सिलिंडरने पुरवठा करण्याची गरज राहणार नाही. अतिदक्षता विभागासह इतर वॉर्डांतही ही यंत्रणा जोडण्यात आली आहे. महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सांगली 

काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन

सर्व पक्षीय कृती समितीने आवाज उठवल्यानंतर ऑक्‍सिजन प्लान्टचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत काम संथ गतीने सुरू आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत ही यंत्रणा अत्यावश्‍यक असून त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. येत्या काही दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com