esakal | साखर कारखान्यांचा अगामी हंगाम लांबणार? ; लॉकडाउनचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Will the next season of sugar mills be extended?

शासनाच्या महसुली उत्पन्नाचा आर्थिक कणा समजला जाणारा साखर उद्योग कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे.

साखर कारखान्यांचा अगामी हंगाम लांबणार? ; लॉकडाउनचा परिणाम

sakal_logo
By
भाऊसाहेब मोहिते

एरंडोली (जि.. सांगली )  : शासनाच्या महसुली उत्पन्नाचा आर्थिक कणा समजला जाणारा साखर उद्योग कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. हंगाम समाप्ती वेळीच कोरोनाने थैमान घातल्याने हंगाम गडबडीत उरकण्यात आला; परंतु आगामी हंगामासाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी लॉकडाउनमुळे ब्रेक लागत आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर पुढील हंगामासाठीच्या तांत्रिक दुरुस्तीस सुरुवात होते. यामध्ये रोलर रिशेलिंग करणे, टर्बाईन दुरुस्ती व साफसफाई, चेनची दुरुस्ती करणे, बॉंयलरची साफसफाई तपासणी व दुरुस्ती बायलिंग हाऊस साफसफाई व दुरुस्ती करणे यांसह कारखान्यातील अन्य दुरुस्तीची कामे आताच करावी लागतात. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य पंजाब, उत्तर प्रदेशसह बेंगलोर, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी मिळते. 

सध्या कोरोनामुळे हे साहित्य लवकर मिळेल याची शाश्वती नाही. शिवाय साहित्य उशिरा मिळाले तर दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत याचीही भीती आहे. तसेच इलेक्‍ट्रीकल मोटर्स-पॅनेल बोर्डस, पॉवर टर्बाईन आदी दुरुस्तीची देखभाल करणारे लोक परराज्यातील, परजिल्ह्यातील असल्याने ही मंडळी दुरुस्ती कामासाठी पोहोचू शकत नाहीत. ही कामे वेळेवर झाली नाही तर ब्रेकडाऊनचीही भीती निर्माण होत आहे. 

या सर्व बाबींचा गाळपावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आगामी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक असल्याने कर्ज आणि व्याजाचे हप्ते आदा होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे बॅंकांनीही पूर्वहंगामी कर्जे वेळेत दिली नाही तर नवीन माल मिळणार नाही. 

प्रामुख्याने साखर कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी आणि पूर्व हंगामी कामासाठी लॉकडाउनमुळे साहित्य, मजूर उपलब्ध होत नसल्याने साखर कारखान्यांच्या तांत्रिकदुरुस्तीला सध्या सुरुवात झाली असली तरी स्पेअर पार्टच्या मिळणाऱ्यावरच सर्व अवलंबून आहे. 
बॉयलरची तपासणीची कामे व दुरुस्ती आणि कॅलिब्रेशन, ईन्ट्रूमेंटस- फ्लो मीटर्स कॅलिब्रेशन, इलेक्‍ट्रीकल इन्स्पेक्‍शन ई. शासकीय नियमाप्रमाणे दरवर्षी करणे बंधनकारक आहेत. म्हणजे बॉयलरची तपासणी करून करावयाची आवश्‍यक कामे तसेच इतर सर्व मशिनरीचे स्पेअर्स आणि जॉबवर्क यांचे मागणीपत्र भरणे, त्यानंतर निविदा मागवणे, दरपत्रके घेणे, किंमतीचे तुलनात्मक तक्‍ते तयार करणे, पर्चेस कमिटी मीटिंग घेणे व नंतरच पार्टीला ऑर्डर देणे या बाबी सहकारी साखर ऊध्योगाला बंधनकारक आहेत. 

त्यामुळे बाजार पूर्णपणे चालू झाल्यानंतरच साहित्य मिळणार आणि त्यानंतर कामे होणार यात खूप दिरंगाई होईल. साखर कारखान्यात लागणारे स्पेअर्स इतर कोणत्याही उद्योगात फारसे वापरले जात नसल्याने, तसेच बरेचसे कास्टिंग मटेरियल असल्याने ते ऑर्डरबरोबर ड्राईंग आणि ऍडव्हान्स दिल्यानंतरच तयार केले जातात. त्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ऐनवेळी मागणी करून स्पेअर्स वेळेत मिळणार नाहीत त्याचा परिणाम मशिनरीच्या देखभालीच्या कामावर होऊ शकतो. 

ही कामे लांबण्याची शक्‍यता 
बॉयलरचे- एफडी आयडी फॅन्स, इतर ब्लोअर्स व रोटरी ईक्वीपमेंटस, सेन्ट्रीफुगल मशिन्सच्या बास्केटचे बॅलसिंग करणे ही कामे बाहेर करावी लागतात. त्यासाठी हे कोल्हापूर, लातूर किंवा बारामती येथे पाठवून बॅलेंसिंग करून आणावे लागतात. ते कारखाने कोरोनामुळे ही कामे वेळेत होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मजुरांची ही येणाऱ्या हंगामात अडचण जाणवणार?
स्पेअरपार्ट बरोबरच कोरोनाच्या धास्तीमुळे ऊस तोडणी मजुरांची ही येणाऱ्या हंगामात अडचण जाणवणार का? हा प्रश्न कारखान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. 
- सूर्यकांत पाटील, कार्यकारी संचालक, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड