सलग दुसऱ्यावर्षीही अधिवेशन बंगळूरात; सरकारची बेळगावबाबत अनास्था

महेश काशीद 
Sunday, 22 November 2020

कोट्यवधी खर्चून बेळगावात सुवर्णसौध बांधण्यात आले. परंतु, सुवर्णसौधला विधीमंडळ अधिवेशनाचे भाग्य मिळानासे झाले आहे. गतवर्षी अतिवृष्टीसह पूरस्थिती उद्‌भवल्यामुळे बेळगाव परिसरातील पिके पाण्याखाली गेली. तर अनेक घरांची पडझड झाली. जुलैमध्ये सुरु झालेला पाऊस डिसेंबरपर्यंत होता.

बेळगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे ओढविलेली पूरस्थिती, तर यंदा कोरोनाचा वाढलेल्या संसर्गाचे कारण पुढे करत बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे 2018 नंतर मागील दोन वर्षे बेळगावात विधीमंडळाचे अधिवेशन भरविण्यात आलेले नाही. आता थेट 2021 सालात त्यावेळेच्या परिस्थितीनुसार अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, बेळगावातील अधिवेशनाअभावी उत्तर कर्नाटकातील विकासावर परिणाम होणार आहे. 

कोट्यवधी खर्चून बेळगावात सुवर्णसौध बांधण्यात आले. परंतु, सुवर्णसौधला विधीमंडळ अधिवेशनाचे भाग्य मिळानासे झाले आहे. गतवर्षी अतिवृष्टीसह पूरस्थिती उद्‌भवल्यामुळे बेळगाव परिसरातील पिके पाण्याखाली गेली. तर अनेक घरांची पडझड झाली. जुलैमध्ये सुरु झालेला पाऊस डिसेंबरपर्यंत होता. या दरम्यान बेळगावसह उत्तर कर्नाटक जलमय झाले. यामुळे बेळगावात विधीमंडळाचे अधिवेशन होणार नसल्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांनी गतवर्षी घोषित केले. त्यानंतर यंदा फेब्रुवारीपासून देशामध्ये कोरोनाचा शिरकाव सुरु झाला. कोरोनाची झळ आजही कायम आहे. परिणामी, कोरोनाचे कारण पुढे करुन यंदाही बेळगावात हिवाळी अधिवेशन भरविणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सुवर्णसौध येथे दरवर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन भरविले जाते. त्यानंतर मात्र सुवर्णसौधचा वापर केला जात नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांची वास्तू वापराविना पडून राहत आहे. यापार्श्वभूमीवर विविध कार्यालयांचे येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. तसा आदेशही बजाविण्यात आला असला, तरी सध्या काही जुजबी कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परंतु, त्यांचे कामही अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाही. त्यातच सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन भरवण्याबाबत राज्य सरकारकडून अनास्था दाखवली जात आहे. मात्र वास्तूच्या देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. 

सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
 
बेळगावात 2018 मध्ये अखेरचे अधिवेशन भरविण्यात आले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे येथे अधिवेशन घेण्यात आलेले नाही. पुढील वर्षीही स्थितीनुसार अधिवेशन भरविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे स्थानिक संघटनांसह विरोधी पक्षांनी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे यंदाचेही हिवाळी अधिवेशन बंगळूरमध्येच होणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The winter session will not be held in Belgaum due to the growing prevalence of corona