डेंगीसदृश आजाराने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंगीची साथ आहे. यंदा मोसमी पाऊस उशिराने आला. यातच महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे झाली नाहीत. त्यामुळे शहरात जागोजाग पाणी साचणे, गटारे, ओढे-नाले तुंबणे असे प्रकार वाढले आहेत.

नगरः शहरातील कोठी भागात राहणाऱ्या सुजाता सुरेश मकासरे (वय 45) यांचा आज डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर काही दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, वारंवार मागणी करूनही कोठी भागात स्वच्छता होत नसल्याने या भागातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंगीची साथ आहे. यंदा मोसमी पाऊस उशिराने आला. यातच महापालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीची कामे झाली नाहीत. त्यामुळे शहरात जागोजाग पाणी साचणे, गटारे, ओढे-नाले तुंबणे असे प्रकार वाढले आहेत. यातच शहरातील घंटागाड्या अनियमित होत्या. त्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण होत आहे. यावर महापालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. गेल्या 15 दिवसांपासून शहरातील काही भागांतच औषध फवारणी व फॉगिंग सुरू आहे. या उशिराने केल्या जाणाऱ्या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळे शहरात डेंगीची साथ बळावली आहे. यात आज सुजाता मकासरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

हेही वाचा ः सापडलेले अडीच लाख केले परत 

कोठी परिसरात अस्वच्छता पसरली असून, उघड्यावरची गटारे तुंबली आहेत. या प्रश्‍नांवर महापालिका प्रशासन व प्रभागातील नगरसेवकदेखील लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असून, अनेक घरांमध्ये रुग्ण आढळत आहेत. यावर महापालिका प्रशासनाने उपाययोजना म्हणून अद्याप औषध फवारणी व फॉगिंगदेखील केले नसल्याचा आरोप स्वप्नील शिंदे या सामाजिक कार्यकर्त्याने केला. 

हेही वाचा ःशिर्डी विमानतळावर "डीव्हीओआर' यंत्रणा सज्ज 

स्वच्छतेच्या प्रश्‍नासाठी संजय कांबळे, सुधीर गायकवाड, सुशांत देवडे, बबलू गायकवाड, थॉमसन केदारे, रवी पोळ, शंकर शिरोळे, रावसाहेब अरुण आदींसह नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

काहीही माहिती नाही 
शहरातील डेंगीच्या साथीने रुग्ण दगावल्याची माहिती मला मिळालेली नाही. याबाबत मला काहीही माहिती नाही. 
- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies of dengue-related illness