माहेरी आलेल्या लेकीचा मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अपघातात मृत्यू; मुलगाही गंभीर जखमी 

दिनेश देशमुख 
Friday, 7 August 2020

सातारा जिल्ह्यातील माधुरी नवनाथ देशमुख या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी माहेरी बोंडले (ता. माळशिरस) येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांच्याकडे आल्या होत्या. आज पहाटे नेहमीप्रमाणे मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख याच्यासह त्या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना हा अपघात झाला. 

बोंडले (सोलापूर) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या माय-लेकरांना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज पहाटे साडेसहा वाजता बोंडले (ता. माळशिरस) येथे घडली आहे. या घटनेची फिर्याद प्रत्यक्षदर्शी प्रल्हाद देवराव जाधव यांनी वेळापूर पोलिस ठाण्यात दाखल केली असून जखमी मुलावर वेळापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. 
माधुरी नवनाथ देशमुख (वय 35, रा. विखळे, जि. सातारा) ह्या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी बोंडले येथे धनाजी लक्ष्मण जाधव यांच्याकडे आल्या होत्या. आज पहाटे नेहमीप्रमाणे मुलगा श्रीजय नवनाथ देशमुख (वय 11) याच्यासह मॉर्निंग वॉकसाठी पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर गेल्या होत्या. माय-लेकरू वेळापूरच्या दिशेने घरापासून चारशे मीटर दूरवर जात असतानाच मागून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने (एमएच 25/यू 6999) त्या दोघांना धडक दिली असता ट्रकखाली चिरडल्याने माधुरी देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला होता. अशा अवस्थेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी प्रल्हाद देवराव जाधव (सेवानिवृत्त शिक्षक) व गावातील युवकांच्या सतर्कतेने त्याचा पाठलाग करून त्या ट्रकचालकास माळशिरस येथे पकडले. प्रल्हाद जाधव यांच्या फिर्यादीवरून सदर घटनेचा वेळापूर पोलिस ठाण्याकडून पंचनामा करण्यात आला असून मालवाहू ट्रक ताब्यात घेऊन ट्रक चालक नबिसा लाडलेसाहब पटेल (वय 35) व चालक मल्लिकार्जुन भिमराव धोरे (वय 42, रा. रामामोला शहाबाद, ता. चितापूर, जि. गुलबर्गा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत माधुरी देशमुख यांचे वेळापूर येथे शवविच्छेदन करून त्यांच्या पार्थिवावर बोंडले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्‍चात पती, सासू, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women died in an accident after going for a morning walk in malshiras taluka