Belgaum: हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा न्यायालयाकडून स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा न्यायालयाकडून स्थगिती

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला पुन्हा एकदा न्यायालयाकडून स्थगिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती पुन्हा एकदा कायम ठेवली आहे. याबाबत गुरुवारी (ता.१५) पुन्हा एकदा येथील चौथ्या दिवाणी न्यायालयात सुनावणी होणार असून यावेळी दोन्ही बाजूच्या वतीने आपले म्हणणे मांडत आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत.उच्च न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात जाण्याची सूचना केली होती. त्यानुसारशेतकऱ्यांनी याचिका दाखल केलेली असताना तरी देखील न्यायालयाचा अवमान करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराकडून बायपासचे काम पोलीस बळाचा वापर करून सुरू करण्यात आले होते. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून देखील शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने ऍड. रविकुमार गोकाकर यांनी येथील दिवाणी व जेएमएफसी चौथ्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे सदर स्थगिती आदेश उठविण्यात यावा, तसेच हा दावा रद्दबातल करण्यात यावा, सदर कंपनीने रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम थांबवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

त्यानंतर शेतकऱ्यांच्यावतीने ऍड. रविकुमार गोकाकर यांनी हलगा-मच्छे बायपासचे काम बेकायदेशीररित्या चालले आहे. महामार्ग चार ते महामार्ग १ हा रस्ता जोडण्यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाकडून कोणताही प्रस्ताव ठराव झालेला नाही. त्यामुळे सदर कंपनीने कामासाठी गुंतवलेले पैसे हा त्यांचा खुळेपणा आहे. शेतकऱ्यांच्या विचार करून न्यायालयाने योग्य न्याय द्यावा. असा युक्तिवाद ऍड. गोकाकर यांनी न्यायालयात केला. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने गुरुवार (ता.२५) तारीख घोषित केले आहे. त्यावेळी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या वतीने आपले म्हणणे मांडून आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत.

loading image
go to top