कार्यकर्त्याने लाभाची अपेक्षा न ठेवता सतत काम केले पाहिजे - अण्णा हजारे

मार्तंडराव बुचुडे
मंगळवार, 22 मे 2018

राळेगणसिद्धी (नगर) : कार्यकर्ता हा ध्येयवादी निस्वार्थी व स्वच्छ चारित्र्य असणारा असला पाहिजे. त्याने राजकीय पदाकडे आकर्षित न होता निष्काम व कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सतत काम केले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

राळेगणसिद्धी (नगर) : कार्यकर्ता हा ध्येयवादी निस्वार्थी व स्वच्छ चारित्र्य असणारा असला पाहिजे. त्याने राजकीय पदाकडे आकर्षित न होता निष्काम व कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता सतत काम केले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

पुण्यातील आशिया मानवशक्ती विकास संस्था, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, भोसरीतील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यकर्ता शिबिरात ते सोमवारी (ता.20) बोलत होते.यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ज्ञ राज मुछाल, संयोजन समितीचे निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, समन्वयक मुरलीधर साठे, अनिल कातळे आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका सांगताना हजारे म्हणाले, कार्यकर्ता हा ध्येयवादी असला पाहिजे. प्रश्नाच्या तळाशी जाऊन अभ्यास केला पाहिजे. त्याने शुद्ध अचार, शुद्ध विचार , निष्कलंक आणि त्यागाची वृत्ती असली पाहिजे. त्याच्या शब्दाला कृतीची जोड असावी, त्याशिवाय शब्दाला वजन प्राप्त होणार नाही. मी आणि माझे असा विचार न करता शेजारी, गाव, देश या गोष्टीला प्राधान्य देऊन काम केले पाहिजे. नेता किंवा पुढारी होण्याचे ध्येय त्याचे नसावे. तो निष्काम भावनेने काम करणार असावा.     

महात्मा गांधींना अभिप्रेत देश घडवायचा असेल तर खेड्यात जाऊन काम केले पाहिजे, खेड्याचा विकास केला पाहिजे. सुख हवे असेल तर दुसऱ्याला सुख दिले पाहिजे. आजचा युवक मी आणि माझे या पलीकडे विचार करत नाही मग देश कसा बदलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुछाल म्हणाले, "जगामध्ये विपुलता आहे. प्रत्येकासाठी निसर्गाने काहीतरी निर्माण केले आहे. वेळ येईल तेव्हा ते प्रत्येक मिळणार आहे. त्यासाठी स्पर्धा करण्याची गरज नाही "     

दळवी म्हणाले, "ज्या खेडेगावात कार्यकर्ते सजग आहेत, तळागाळात जाऊन कार्य करणारे आहेत, त्या गावाचा विकास लवकर होतो. गावाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. शहरातील माणूस खेड्यात आला तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. शिबिरातून विश्वास असलेला कार्यकर्ता निर्माण होईल असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केला.

शिबीरात प्रा. दिगंबर ढोकले, अरुण इंगळे , श्रीकृष्ण अत्तरकर, कवी भरत दौंडकर, राजेश भड, नागेश वसतकर, जयश्री साठे, सुरेश कंक, दत्तात्रय येळवंडे, कैलास गायकवाड, संगीता कोळी, पाडळीचे सरपंच डी. बी. करंजुले, विट्ठलराव साठे, किरण साठे, माजी सरपंच आप्पासाहेब साठे ,भास्कर पाटील यांच्या सह अमरावती, धुळे, कोकण, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, व नगर येथील सुमारे शंभरावर कार्यकर्ते सहभागी होते. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले तर स्वागत सुदाम भोरे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे व आभार राजेंद्र वाघ यांनी व्यक्त केले.

Web Title: The worker should work continuously without expecting gains says anna hajare