
एसटी कामगारांना दोन महिन्याचे थकीत वेतन, ऑक्टोबरचे नियमित वेतन आणि भत्ते मिळावेत यासाठी राज्यभर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
सांगली : एसटी कामगारांना दोन महिन्याचे थकीत वेतन, ऑक्टोबरचे नियमित वेतन आणि भत्ते मिळावेत यासाठी राज्यभर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी निवेदन दिले. तत्काळ वेतन न मिळाल्यास 9 नोव्हेंबरला कामगार कुटुंबासह आक्रोश करतील असा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला.
संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसिलदार तसेच आमदार सुमन पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ आदींना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, दिवाळी सण 12 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या सणापूर्वी एसटी कामगारांना ऑगस्ट व सप्टेंबरचे थकीत वेतन आणि ऑक्टोबरचे नियमित वेतन मिळाले पाहिजे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सणाची उचल मिळाली पाहिजे.
वास्तविक कायद्यानुसार एसटी कामगारांना नियमित तारखेला वेतन मिळाले पाहिजे. त्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना देखील अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष वाढला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच थकीत वेतन, नियमित वेतन आणि भत्ते मिळावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण राज्यात लोकप्रतिनिधींसह, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना निवेदन दिले जात आहे. त्यानंतरही वेतन, भत्ते, सण उचल न मिळाल्यास एसटी कामगार राहत्या घरासमोर कुटुंबियासह 9 ऑक्टोबरला आक्रोश व्यक्त करतील. 9 तारखेपर्यंत जर कार्यवाही न झाल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यासाठी राज्यपातळीवर निर्णय घेतला जाईल असेही या निवेदनात म्हटले आहे.
विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव नारायण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष शमू मुल्ला, अफसर पटेल, राजेश पाटील, दिलीप चौगुले, अशोक शिरोटे, सुधीर कोळी आदींनी विविध ठिकाणी निवेदने दिली.
संपादन : प्रफुल्ल सुतार