#WorldSparrowDay चिऊताई आली अंगणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत. 

कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत. 

शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषत: सकाळी अन्‌ संध्याकाळी चिमण्यांची चिवचिव अंगणात, बाल्कनीसमोर, टेरेसवर पाहायला मिळत आहे. अनेक चिमण्यांनी आज मानवी वस्तीत घरटे बांधायला सुरवात ही केली आहे. चिमणीला लागणारे आवश्‍यक खाद्य परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.

विशेषत: मोबाईल टॉवरमुळे काही वर्षापूर्वी अन्य पक्ष्यांप्रमाणेच चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसत होती. आज मात्र मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींनाही चिमण्या "सर्व्हायल ऑफ दी फिटेस्ट' झाल्या आहेत, असे काही पक्षीतज्ज्ञांनी सांगितले. 

चिमण्या अंगणात याव्यात, यासाठी चेतना शाळेसह विविध संस्थांनी तयार केलेली घरटी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. आजही अशा घरट्यांना मोठी मागणी आहे. भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियमच्या चोथ्याला पर्याय म्हणून नारळाच्या शेंडीपासून तयार केलेल्या आकर्षक चोथ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाळलेल्या भोपळ्यापासूनही आता घरटी तयार होवू लागली आहेत. अशा पध्दतीची घरटी बनवणे आणि नारळाच्या शेंडीपासून चोथा तयार करण्याच्या कार्यशाळांना प्रतिसाद मिळतो आहे. 

अशी बनली लोकचळवळ... 
"सकाळ'ने सहा वर्षांपूर्वी 20 मार्च 2012 ला "चला, चिमण्या वाचवू या' अशी साद कोल्हापूरकरांना घातली आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून विविध अनुभव अनेक घटकांनी "सकाळ'सोबत शेअर केले. त्याशिवाय विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने साडेचार हजार घरट्यांचे वाटप "सकाळ'च्या पुढाकाराने झाले. 2012 ते 2015 या काळात अधिकाधिक चिमण्या अंगणात याव्यात, यासाठी विविध संकल्पना पुढे आणून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. चित्र, छायाचित्र प्रदर्शनाबरोबरच स्लाईड शोंचे विविध ठिकाणी आयोजन झाले. त्यानंतर सलग दोन वर्षे सोशल मीडियावरून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली गेली आणि ही मोहीम संपूर्ण जगभरात पोचली. जगभरातील विविध ठिकाणी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक असलेली मराठी तरुणाईही या मोहिमेत सक्रिय सहभागी झाली. 

सकारात्मक परिणाम 

  • घराच्या परिसरात चिमण्या व इतर पक्षांसाठी हक्काचा निवारा देण्याची मानसिकता वाढली. 
  • कुंभार गल्ल्यांत खास चिमणी व इतर पक्ष्यांसाठी मातीची पराळं (जलपात्रे) तयार होऊ लागली. 
  • टेरेस बागेत चिमण्या व पक्ष्यांसाठी सुविधा देताना फूडकोर्ट, वॉटर-ज्युस सेंटर, स्विमिंग सेंटर अशा संकल्पना राबवल्या जाऊ लागल्या. 
  • आर्किटेक्‍ट व बांधकाम व्यावसायिकांनी घर बांधकामाचे प्लॅन्स बनवतानाच चिमण्या व पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने निर्माण करण्यासाठी आवश्‍यक डिझाइन्स तयार केली. अनेकांनी ती प्रत्यक्षात अमलात आणली. 
  • विशेष मुलांच्या शाळांनी तयार झालेली घरटी विविध संस्थांच्या माध्यमातून काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गेली. या शाळांतून महिन्याला किमान तीस घरटी जातात, असे चित्र आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Sparrow Day special