पंचवीस वर्षांनंतर त्यांना पुन्हा साद घातली 

पंचवीस वर्षांनंतर त्यांना पुन्हा साद घातली 
Updated on

शिर्डी : साईनाथ विद्यालयातील इयत्ता दहावी "अ' आणि "ब' तुकडीतील सव्वाशे मुले आणि मुली पंचवीस वर्षांनंतर आपल्या शाळेत एकत्र जमले. त्यांनी आपल्या गुरुजनांची पाद्यपूजा केली. शाळेला ध्वनिक्षेपक यंत्रणा भेट दिली. मैदानावर बालपणापासून उभ्या असलेल्या खो-खो खांबांनी त्यांना पुन्हा साद घातली. त्यास प्रतिसाद देत हे माजी विद्यार्थी मैदानावर गेले. 

हास्याचे फवारे उडवीत खो-खोचा डाव आणि त्यानंतर गप्पांचा फड रंगला. गुरुजनांचे मनोगत ऐकताना कधी डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या, तर कधी पंचवीस वर्षांच्या कालखंडात कोणी मारलेली मजल पाहून कोणी तोंडात बोटे घातली. शाळेतील त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीत सर्व जण रमले. प्रापंचिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून सर्व जण एक दिवस स्वतःसाठी जगले. 

प्रसन्न शिरगावकर, सुनील दवंगे, संदीप सोनावणे, मंगेश कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मेळा जमविला. साईसंस्थानाचे माजी विश्‍वस्त व या शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले शांताराम मिराणे यांनी आपल्या खुमासदार भाषणाने या मेळ्यात रंग भरला. तत्कालीन मुख्याध्यापक अभिमन्यू चव्हाण व शिक्षक भास्कर गोंदकर यांनी कोणाला शिक्षा केली आणि कोणाच्या पाठीवर शाबासकीची थाप कशी दिली, याच्या आठवणी कथन केल्या. 

विद्यार्थी मनोगत व्यक्त करत असताना कधी टाळ्यांचा गजर व्हायचा, तर कधी त्या दिवसांच्या आठवणींनी वातावरण शांत व्हायचे. ही मुले आपल्या वर्गात गेली. तेथील खिडक्‍या, बेंच, टेबल आणि फळा, सर्व काही तसेच होते. मग कोणी बेंचवर बसले, कोणी खिडकीतून बाहेर नजर लावून पूर्वीच्या आठवणीत गढून गेले. आपण तेच आहोत; पण आता पूर्वीचे दिवस आहेत कुठे? कधीही परत न येण्यासाठी ते आपल्या सर्वांपासून दूर गेले. उरल्या आहेत त्या केवळ आठवणी. त्या आठवणींना उजाळा देत सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घराचा रस्ता धरला. दिवस मावळला तशी शाळा पुन्हा शांत झाली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com