खरं तर...पैलवान असतो सर्वाधिक बुद्धिमान - आमीर खान

खरं तर...पैलवान असतो सर्वाधिक बुद्धिमान - आमीर खान

कोल्हापूर - कुस्ती हा जगातील एकमेव असा जुना खेळ आहे, की त्यात प्रतिस्पर्ध्याला चितपट करताना त्याला कुठे किरकोळ जखमही होणार नाही, याची खबरदारी पैलवान घेतो... पैलवान बुद्धीने कमी असतात असं कोण म्हणतो? खरं तर तोच सर्वाधिक बुद्धिमान असतो आणि म्हणूनच प्रतिस्पर्ध्यावर क्षणाचाही विलंब न लावता डाव-प्रतिडाव करत असतो... बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान दिलखुलास संवाद साधत होता. निमित्त होते आमीर आणि सहकलाकारांच्या कोल्हापूर भेटीचे. 

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मोतीबाग तालमीचे आमीरने भरभरून कौतुक केले. महाराष्ट्राने कुस्ती जीवापाड जपली असून, कोल्हापूर ही कुस्तीपंढरी असल्याचे गौरवोद्‌गार त्याने काढले. ‘दंगल’ हा आमीरचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर तालमीच्या वतीने आमीरला विशेष निमंत्रण दिले होते. चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे तालमीच्या आखाड्यातील आमीरची भेट रद्द झाली. मात्र, महान भारत केसरी दादू चौगुले यांच्या घरी त्याने माध्यमांशी संवाद साधला. दादू चौगुले, हिंदकेसरी विनोद चौगुले, अमोल चौगुले यांच्या हस्ते आमीरचा चांदीची गदा देऊन सत्कार झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नीतेश तिवारी, फातिमा सना शेख, सन्या मल्होत्रा उपस्थित होते. 

‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीला प्रोत्साहन मिळेल आणि कुस्तीतील ऑलिंपिक पदके मुलांबरोबरच मुलीही नक्कीच देशासाठी घेऊन येतील, असा आशावाद व्यक्त करताना आमीरने चित्रपटाविषयीच्या विविध आठवणी शेअर केल्या. आमीर म्हणाला, ‘‘चित्रपटासाठी पाच महिन्यांत तब्बल सत्तावीस किलो वजन वाढवले आणि तेवढेच कमी करावे लागले. तमिळ आणि तेलगू भाषांतही लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर आता ‘थग्ज्‌ ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. ‘सत्य मेव जयते’च्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पाणी फाउंडेशन स्थापन केले असून, राज्यातील सर्व तालुक्‍यांत लवकरच काम सुरू होईल.’’ 

सध्याच्या नोटाबंदीच्या काळात सर्वच क्षेत्रांत मंदीचे सावट आहेत. अशा काळात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही धोके वाटत नाहीत का, या प्रश्‍नावर आमीरने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. काळा पैसा देशासाठी घातक आहे. तो संपवण्यासाठीच हा निर्णय झाला असून, प्रत्येकाला थोडासा त्रास होणार आहे आणि त्यात मीही एक असेन. प्रत्येकाने हा थोडासा त्रास देशासाठी सोसायलाच हवा.’’  

महान भारत केसरी दादू चौगुले यांनी आभार मानले. ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीला आलेली मरगळ झटकून आता सारेच पुन्हा जोमाने कामाला लागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  

पैलवानांत नाराजी
मोतीबाग तालमीत आमीरच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. महापौर हसीना फरास, आमदार सतेज पाटील, ॲड. महादेवराव आडगुळे आणि तालमीच्या पदाधिकाऱ्यांसह पैलवान आमीरच्या प्रतीक्षेत होते. आखाड्यात कुस्तीची प्रात्यक्षिकेही दाखवण्याचे नियोजन होते. माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आमीर तालमीत येणार, असे सांगितले जात होते. मात्र, माध्यमांशी संवाद साधल्यानंतर तालमीतील कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितल्याने सर्वांवरच नाराजी ओढवली.

आमीर सांगतो....
कोल्हापूर हे एक ‘खुबसुरत’ ऐतिहासिक शहर
‘सत्य मेव जयते’च्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न
स्वतःला ‘परफेक्‍शनिस्ट’ मानत नाही. जे काम करायचे ते मनापासून करतो आणि सर्वोत्तमतेचा ध्यास जपतो.
आयुष्यात चांगल्या भूमिका करता आल्या. त्याचे खरे श्रेय लेखक- दिग्दर्शकांनाच जाते.
नोटाबंदीचा निर्णय चांगलाच. प्रत्येकाने थोडासा त्रास सहन करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com