यंदाचा पाऊस आषाढी वारीविना; या दिंडी मार्गावर शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

यंदा सारेच सुनसुने आहे. दिंडीमार्गावरील शुकशुकाट अस्वस्थ करणारा आहे.

मिरज : आषाढी वारीच्या आधीच चार-पाच दिवस हजारो दिंड्यांनी येथील मिरज-पंढरपूर मार्ग ज्ञानोबा-तुकोबा-विठुमाऊली नामाच्या गजराने व्यापलेला असतो. यंदा मात्र कोरोना आपत्तीने हा सारा माहोलच गायब झाला आहे. रिमझिम पावसाची फिकिर न करता दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेत परिसरातील गावांतील हजारो ग्रामस्थ दरवर्षी व्यस्त असतात. यंदा मात्र सारेच सुनसुने आहे. दिंडीमार्गावरील शुकशुकाट अस्वस्थ करणारा आहे. 

उत्तर कर्नाटक आणि कोल्हापूर-कोकणातील हजारो दिंड्यांचा पंढरीला जायचा हक्काचा मार्ग मिरजेतून जातो. टाळमृदंगाच्या निनादाने दरवर्षी आषाढीच्या आधी सारे शहर माऊलीमय होते. या दिंडींचे जागोजागी मुक्काम असतात. तिथेच आजुबाजूचे ग्रामस्थ या वारकऱ्यांची सेवा करून विठुमाऊलीच्या दर्शनाचाच लाभ घेतात.

यंदा मात्र टाळ-मृदंगाचा निनादच हरवला आहे. पंढरीच्या यात्रेवरील निर्बंधामुळे गावोगावच्या दिंड्या यंदा निघाल्या नाहीत. त्यामुळे शहरातील सेवाभावी संस्था, मंडळे, वारकरी संप्रदाय आणि अनेक कुटुंबांना यंदा हवं हवंसं हरवल्याची भावना आहे. पुण्यकर्मास मुकल्याची खंत या सेवेकऱ्यांना वाटतेय. शेकडो वर्षांची ही परंपरा प्रथमच खंडित झाली. आठ दहा हजार वारकरी चार दिवसात शहरातून रवाणा होत असल्याने या वाटेवरील अर्थकारणालाही ब्रेक लागला आहे. 

साठविला हरी हृदय मंदिरी 
कोरोनाची आपत्ती विश्वव्यापी आहे. वारीच्या गर्दीने या आपत्तीमध्ये भर घालणे कदापि योग्य नाही. ते धर्मतत्वातही बसणारे नाही. प्रत्येक वारकऱ्याची भावना "साठविला हरी हृदय मंदिरी' अशीच आहे. चराचरात व्यापलेल्या माऊलीचे दर्शन वारकरी कुठूनही घेऊ शकतो. त्यामुळे माऊलीला यंदाचा न्मस्कार घरातूनच. 
- सुरेश नरुटे, अध्यक्ष, सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year's rain without Ashadhi Wari; No one this Dindi route