डिझाईन क्षेत्र संधींचे उलगडले पर्याय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - डिझाईन हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या क्षेत्रात नेमक्‍या काय संधी आहेत, भविष्यातील विविध प्रवाह कसे असतील आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर करिअरचे पर्याय निवडताना नेमकी कोणती तयारी करायला हवी, याबाबतच्या टिप्स आज तरुणाईला मिळाल्या. निमित्त होते, ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’च्या ‘यिन फेस्ट’ या संवादमालिकेच्या उद्‌घाटनाचे. येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात सुमारे अडीच तास रंगलेल्या या संवादातून डिझाईन क्षेत्रातील संधींचे पर्याय उलगडले.

कोल्हापूर - डिझाईन हा आता प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या क्षेत्रात नेमक्‍या काय संधी आहेत, भविष्यातील विविध प्रवाह कसे असतील आणि या साऱ्या पार्श्‍वभूमीवर करिअरचे पर्याय निवडताना नेमकी कोणती तयारी करायला हवी, याबाबतच्या टिप्स आज तरुणाईला मिळाल्या. निमित्त होते, ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’च्या ‘यिन फेस्ट’ या संवादमालिकेच्या उद्‌घाटनाचे. येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात सुमारे अडीच तास रंगलेल्या या संवादातून डिझाईन क्षेत्रातील संधींचे पर्याय उलगडले. डिझाईन आणि सरोदवादनातील तज्ज्ञ ध्रुपद मिस्त्री व प्रसिद्ध व्हिज्युअल इफेक्‍ट डिझायनर प्रसाद सुतार यांनी तरुणाईशी संवाद साधला. 

डिझाईन आणि संगीत, असा तौलनिक अभ्यास मांडताना ध्रुपद मिस्त्री यांनी विविध संकल्पना मांडल्या. येथील विद्यार्थ्यांना हा अनुभव पहिल्यांदाच मिळाला. संगीत आणि डिझाईन या दोन्ही गोष्टीमध्ये काही समान धागे आहेत आणि म्हणूनच डिझाईनमधील संगीत आणि संगीतातील डिझाईन एक वेगळीच अनुभूती देतात, असे त्यांनी सांगितले. बिंदू, रेषा, आकारापासून ते सूर, ताल आणि आवाजापर्यंतच्या विविध गोष्टींची माहिती त्यांनी सप्रयोग दिली. 

प्रसाद सुतार मुळचे कुरुंदवाडचे, पण सध्या बॉलीवूड, व्हीएफएक्‍स आणि प्रसाद सुतार हे एक अतूट समीकरणच. ‘गुलाम’, ‘दंगल’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि अलीकडच्याच बहुचर्चित ‘पद्मावत’ अशा दोनशेहून अधिक चित्रपटांना त्यांनी व्हिज्युअल इफेक्‍टस्‌ दिले आहेत. साहजिकच त्यांच्या संवादातून हा सारा प्रवास उलगडला. प्रत्यक्ष चित्रीकरण आणि पडद्यावर सिनेमा कसा असतो, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. 
सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी ‘यिन फेस्ट’ उपक्रमाची संकल्पना सांगितली. ‘गावाकडे चला’ असे सांगतानाच जगभरातील बदलांशी तरुणाईला जोडणारी ही एक चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, प्राचार्य अजय दळवी यांच्या हस्ते वक्‍त्यांचे सत्कार झाले. ‘यिन’चे प्रमुख तेजस गुजराथी यांनी आभार मानले. दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप उपक्रमाचे सहप्रायोजक होते.

तरुणाईच्या जाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावे, या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ‘यिन फेस्ट’सारख्या उपक्रमातही अधिकाधिक तरुणाईने सहभागी झाले पाहिजे. 
- ऋतुराज पाटील, संचालक, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप

फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी लिंक अशी -
https://www.facebook.com/YINforchange

Web Title: YIN fest Design Field