योग वर्गातून ते खाद्य यात्रेकडे 

JAYSING KUMBHAR
Friday, 24 July 2020

कोरोनाचं संकट सर्वव्यापी. आरोग्यापेक्षाही अर्थकारणाला अधिक ग्रासणारं. कोरोना आपत्तीच्या काळात रोजगारांवर गदा आली. बेरोजगारीवर मात करण्यासाठी नव्या वाटा शोधणारेही अनेकजण. जगण्याचा संघर्ष हा सुरुच असतो. कधी कधी या आपत्तीतूनच नव्या संधीची दारे खुली होतात. अशा संधीसाठी डोळे उघडे ठेवून प्रयत्न करणाऱ्या काही संघर्षशील प्रेरणादायी वाटाडे. म्हणूनच त्यांचे अनुभव इतरांसाठी महत्वाचे. 

सांगली ः जवळपास दहा बारा वर्षे खासगी नोकरी केल्यानंतर मी योगासनांकडे वळले. तेच माझे करीअर झाले. योगशिक्षक म्हणून काम करताना अनेकांशी छान परिचय झाला. आवडीचं काम करताना स्वतः आणि इतरांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा आनंद मिळत होता आणि कोरोनाची आपत्ती सुरु झाली. सगळे संदर्भच बदलले. याच टाळेबंदीत पती अदित्य मुंबईतून आले. मुलगा शुभंकर, जो मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो तोही सांगलीत आला. टाळेबंदीची दोन महिने गेली आणि पुढे काय याचे चित्रही बऱ्यापैकी स्पष्ट झाले. आपल्याला इथेच काही तरी केलं पाहिजे याची जाणिव झाली आणि आम्ही मंजुषा गृह उद्योग सुरु केला.... मंजुषा कुलकर्णी सांगत होत्या. 

नोकरदार बाईच्या अडचणींची मला जाणिव होती. तयार पिठं, मसाले आणि चटण्या द्यायचं ठरवलं. माझ्या मित्रगोतावळ्यात त्यासाठी म्हणून माझी ओळख होतीच. हे करताना ते "फ्रेशच' असलं पाहिजे हा माझा आग्रह राहिला. ऑर्डर दिल्यानंतर काही तासात किंवा दुसऱ्या दिवशी ते मिळेल याची खात्री दिली. बघता बघता चांगलीच ऑर्डर मिळू लागली. गहू,ज्वारी, बाजरी, डांगर, डोसा अशा सर्व प्रकारची तयार फ्रेश पिठांची आता चांगलीच मागणी आहे. सोबतीला सर्व प्रकारच्या चटण्या, मसाल्यांची मागणी सुरु झाली. याला कारण माझा मुलगा ठरला. शेफ म्हणून त्यांच्याकडे देशोदेशींच्या-प्रांतो-प्रांतीच्या खाद्यपदार्थांची त्यांच्याकडे इतकी विविधता आहे की आता तो बनवत असलेल्या खाद्यपदार्थांनाही खूप मोठी मागणी आहे.

कोरोनाच्या धास्तीने हॉटेलिंग संपले आहे. अशा वेळी आम्ही कटाक्षाने सर्व घरचीच मंडळी त्याला सर्व प्रकारची मदत देतो. हे पदार्थ न्यायला ग्राहकांनी स्वतःच घरून न्यावेत जेणेकरून संसर्गाचा धोका नाही. व्हॉटसऍप ग्रुप्स आणि संपर्क क्रमांकाच्या जाळ्यातून आम्ही चांगलाच जम बसवला असून आता मुलाने इथेच करिअर करायचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात आम्ही आमचा हा उद्योग अधिक नेटकेपणाने विस्तारणार आहोत. जगभरातील खाद्यपदार्थाची चव सांगलीकरांना घरपोहच चाखायला द्यायची शुभंकरची इच्छा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From yoga classes to food trips