
नेवासे : कोरोना व्हायरसने जगभरात हजारो बळी घेतले आहेत. अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले आहे. लाखोंच्या संख्येने संसार उघड्यावर आले आहेत. परंतु कोरोना आता खूनही करू लागला आहे. नेवासा तालुक्यात खुनाचा प्रकार घडला.
कोरोनाची भिती वाटली आणि लोकं शहरातून गावाकडे निघाली. जथ्थेच्या जथ्थे रोज गावाकडे निघाले आहेत. लपून छपूनही येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाववाले आणि परगावचे लोक येऊ नये म्हणून लोकांनी त्यांची वाटच अडवली आहे. काही ठिकाणी रस्ते खोदले आहेत. काही गावांत काठ्या टाकल्या आहेत.
हा प्रकार बेकायदा आहे. परंतु प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे अनर्थ घडत आहेत. कोकणात घडलेली घटनाही तशीच. नेवाशात घडलेला प्रकार भयानक होता. गावाप्रमाणेच शहरी भागात काही नगर, कॉलन्या बंद असल्या, तरी तेथे नागरिकांना अनेक पर्याय आहेत. ग्रामीण भागात गावातील रस्त्यांबरोबरच दुसऱ्या गावांना जोडणारे रस्तेही अडथळे करून बंद केले आहेत. हे ऐनवेळी अत्यावश्यक सेवेच्या दृष्टीने तेवढेच धोक्याचेही आहे.
रामडोह (ता. नेवासे) येथील रवींद्र नंदू परसय्या यांच्या आठ महिन्यांच्या चिमुरडी आजारी पडली. तिला रात्री उलट्या व्हायला लागल्या. ती तापाने फणफणली, सकाळ झाली की तिला दवाखान्यात न्यायचे असे पालकांनी ठरवले. त्यांनी सकाळी शिरसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीच उपस्थित नसल्याने येथीलच खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठविले. मात्र, रात्री साडेनऊच्या दरम्यान तिला पुन्हा ताप, जुलाबाचा त्रास व्हायला लागला. आजोबा नंदू परसय्या एका वाहनाने वरखेडमार्गे शिरसगावकडे निघाले. मुख्य रस्त्यावर रस्तेबंदी केल्याने त्यांनी पुन्हा सुरेगावमार्गे शिरसगाव प्रवास सुरू केला. मात्र, हाही रस्ता बंद. मुलीला लवकर हॉस्पिटलला नेणे गरजेचे होते. वाहन न्यायचे तरी कसे कारण सर्वच रस्ते बंद. काही खोदून ठेवलेले. नंदू यांनी गावातून काही मित्रांना मदतीला बोलावून घेतले. त्यांनी रस्त्यावरील सर्व अडथळे हटवले. या प्रकारात बराच वेळ गेला.
सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी दीड तास
नातील दवाखान्यात नेईपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले. मात्र, शिरसगाव एक दोन फर्लांग राहिले असेल तोच नातीने आजोबाच्या मांडीवर सोडला. हा बळी होता कोरोनाचा आणि प्रशासनाच्या अनास्थेचा. तसेच बेकायदा अडथळा निर्माण करणाऱ्यांच्या बेमुर्वतखोरीचा. कारण रामडोह-शिरसगाव सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल दीड तास लागला. कदाचित तिला वेळेवर औषधोपचार मिळाले असते, तर तिचे प्राण वाचले असते.
रात्री आजारी नातीला उपचारासाठी घेऊन जाताना कोरोनामुळे रस्त्यांवर केलेल्या अडथळ्यांमुळे दवाखान्यात वेळेवर पोचू शकलो नाही. त्यामुळे तिने रस्त्यातच जीव सोडला.
- नंदू परसय्या, मुलीचे आजोबा, रामडोह
तिला ताप होता
त्या चिमुकलीला प्राथमिक उपचारासाठी माझ्याकडे आणले होते. तिला खूपच अशक्तपणा होता. तसेच ताप, उलट्या, जुलाबाचा त्रास होता. तपासणी केल्यावर नेवासे येथे पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याचे त्यांना सांगण्यात आले होते.
- डॉ. संजय तावरे, शिरसगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.